India vs South Africa 3rd T20 Rishabh confused over the choice of lashes | India vs South Africa 3rd T20: फटक्यांची निवड करण्यावरून रिषभ संभ्रमात
India vs South Africa 3rd T20: फटक्यांची निवड करण्यावरून रिषभ संभ्रमात

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

चिन्नास्वामीवर नाणेफेक जिंकूनही आधी क्षेत्ररक्षण करण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र मी पराभवासाठी हा मोठा मुद्दा मानत नाही. हा संघ असे आव्हानात्मक निर्णय स्वीकारून पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी सज्ज होऊ इच्छित आहे.

तिसऱ्या सामन्यातील पराभव एक धक्का आहे, हे खरे; पण याला अधिक महत्त्व देणे योग्य नाही. संघ व्यवस्थापन विशेष योजनेंतर्गत डावपेच आखण्यात व्यस्त आहे. आक्रमक फलंदाजी लाईनअप उभारणीवर जोर दिला जात आहे. परिस्थितीनुरूप स्वत:ला उत्कृष्ट स्थितीत फिट बसविण्यावर कुठल्याही संघाचे यश विसंबून असते. माझ्यामते मधल्या फळीने यापासून धडा घ्यावा.

५० षटकांच्या सामन्यासारखीच टी२० मध्येही भारतीय संघाची भिस्त टॉप थ्रीवर आहे. त्यामुळे बरेचदा मधल्या फळीला काही करण्याची संधी मिळत नाही. पण जेव्हा संधी येत असेल तर मधल्या फळीने स्वत:ची क्षमता दाखवायलाच हवी. दुर्दैवाने रविवारी असे घडू शकले नाही. एक बाद ६३ अशा सुस्थितीतून २० षटकात ९ बाद १३४ इतक्याच धावांवर डाव थांबला.

काही महिन्यांपासून रिषभ पंतवर नजर आहे. नैसर्गिक खेळून हा खेळाडू शानदार कामगिरी बजावतो. मात्र सध्या फटके मारण्यावरून तो संभ्रमात आहे. फटक्यांच्या निवडीवरून त्याच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. धावफलक हलता ठेवण्यासाठी तो नवे काही करू इच्छितो. ते शक्य होत नसल्याने मोठे फटके मारताना चुकीच्या पद्धतीने बाद होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रिषभने पाचव्या किंवा सहाव्या स्थानी यावे. श्रेयस अय्यरला चौथ्या स्थानी खेळवलेले बरे. यामुळे गमावलेला आत्मविश्वास परत येऊ शकतो.

द. आफ्रिका तिसऱ्या सामन्यात नव्या डावपेचासह खेळला. गोलंदाजी अप्रतिम होती. हेंड्रिक्स व फॉर्च्युन यांनी भेदक मारा करीत बळी घेतले. त्यामुळेच भारताचे बलाढ्य फलंदाज फ्लॉप ठरले. कर्णधार क्विंटन डिकॉकने शानदार फलंदाजी करीत सहकाऱ्यांमध्ये उत्साहाचा संचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.


Web Title: India vs South Africa 3rd T20 Rishabh confused over the choice of lashes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.