India vs England 3rd Test : अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi Stadium) यांचं नाव दिल्यानंतर मोठा वाद उद्भवला. विरोधकांनी टीका केल्या. हा सरदार पटेल यांचा अपमान असल्याची टीका काँग्रेसकडून झाली. पण, आता सरकारनं त्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. फक्त मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव दिलं गेलं आहे, पण स्पोर्ट्स संकूल हे सरदार पटेल यांच्याच नावानं ओळखलं जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं.
यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम
नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,''फक्त मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यात आलं आहे आणि हे क्रीडा संकूल वल्लभभाई पटेल यांच्या नावानेच ओळखलं जाईल.''
जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का ? अमित शाह म्हणाले...अमित शाह यांनी या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी यांच्या नावावार का ठेवलं याची माहिती दिली. "आम्ही या स्टेडियमचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिलं होतं. जे आता साकार झालं आहे. नवं स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आलं आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानंही ओळखली जाईल," असं अमित शाह म्हणाले.