India vs County XI: Hundred for Haseeb Hameed : टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघानं 17 सदस्यीय संघाची आज घोषणा केली. 2016नंतर इंग्लंडच्या संघात टीम इंडियासाठी एक परिचयाचे नाव दिसले आणि ते म्हणजे हसीब हमीद... 2016मध्ये 19व्या वर्षी टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या हसीब हमीद याचे पाच वर्षांनंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन झालं अन् त्याच हसीबनं सराव सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक झळकावलं. भारतानं पहिल्या डावात 311 धावा केल्यानंतर कौंटी एकादश संघाकडून हसीब हमीदनं दमदार खेळ केला. त्यानं मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना सतावले.
2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?
लोकेश राहुलचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या डावात 311 धावा केल्या. विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था 3 बाद 67 धावा अशी झाली होती. पण, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सारवला. क्रेग माईल्सनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लोकेश १५० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर रिटायर्ड झाला. त्यानंतर रवींद्र जडेजानं १४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७५ धावा केल्या.
उमेश यादवनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. जॅक लिब्बी 12 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे रोबर्ट याटेस ( 1) व वॉशिंग्टन सुंदर ( 1) यांना माघारी पाठवले. उमेशनं दुसरी विकेट घेताना कर्णधार विल ऱ्होड्सला ( 11) बाद केले. दोन विकेट्स घेणाऱ्या लिंडन जेम्सनं सलामीवीर हसीबला उत्तम साथ दिली. जेम्स 27 धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ कौंटी एकादशला आणखी एक धक्का बसला. दरम्यान हसीबनं शतक पूर्ण केले. शार्दूल ठाकूरनं त्याची विकेट घेतली. हसीब 246 चेंडूंत 13 चौकारांसह 112 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कौंटी एकादश संघानं 9 बाद 220 धावा केल्या आहेत. उमेश यादवनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स घेतल्या.