ठळक मुद्देराहुलला यावेळी अर्धशतकासाठी तीन धावा कमी पडल्या.
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्माने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली, पण त्याला फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर धवन आणि राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. धवनने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा केल्या. राहुलला यावेळी अर्धशतकासाठी तीन धावा कमी पडल्या.
राहुल आणि धवन दोन षटकांमध्ये बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव चांगलाच गडगडला. कर्णधार विराट कोहली, मुंबईकर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी आणि कुलदीप यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.