India vs Australia, 4th Test Day 4 : वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या १२३ धावांच्या भागीदारीनंतर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं ३३६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांच्या नाममात्र आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले.
२५व्या षटकात शार्दूलनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. विल पुकोव्हस्कीच्या जागी संघात आलेल्या मार्कस हॅरीसला त्यानं बाद केलं. उत्तम बाऊन्सर टाकून त्यानं हॅरिसला माघारी जाण्यास भाग पाडले. ऑसी सलामीवीरानं ८२ चेंडूंत ८ चौकारांसह ३८ धावा केल्या. पुढच्याच षटकात वॉशिंग्टननं
डेव्हिड वॉर्नरचा अडथळा दूर केला. वॉर्नर ७५ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ४८ धावांवर असताना वॉशिंग्टननं त्याला पायचीत केलं. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन आक्रमक खेळ करताना दिसले आणि अजिंक्य रहाणेनं त्यांना रोखण्यासाठी
मोहम्मद सिराजला पुन्हा गोलंदाजीला बोलावले.
अजिंक्यची ही चाल यशस्वी ठरली आणि सिराजनं एकाच षटकात लाबुशेन ( २५) व मॅथ्यू वेड ( ०) यांना माघारी पाठवले. लंच ब्रेक झाला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ४ बाद १४९ धावा करून १८२ धावांची आघाडी घेतली आहे.