सिडनी - बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आज संपलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत सामना वाचवण्यात यश मिळवले. त्यासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम ठेवण्यातही भारतीय संघ यशस्वी ठरला. मात्र आधीच दुखापतींनी त्रस्त असलेल्या भारतीय संघाला सिडनी कसोटी आटोपल्यानंतर अजून एक मोठा धक्का बसला आहे. सिडनी कसोटीत चौथ्या डावात जिगरबाज खेळी करून सामना वाचवणारा हनुमा विहारी दुखापतीमुळे ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांच्यापाठोपाठ हनुमा विहार हासुद्धा दुखापतग्रस्त झाला होता. स्नायू दुखावले गेल्याने हनुमा विहारी विहारीला फलंदाजीदरम्यान, प्रचंड त्रास होत होता. मात्र तरीही त्याने एक बाजू लावून धरत ऑस्ट्रेलियाचे वेगवान आक्रमण थोपवून धरले होते. दुखापत झाली असतानाही त्याने १६१ चेंडूत नाबाद २३ धावांची खेळी केली. या खेळीमुळे हा सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश मिळाले.
मात्र फलंदाजी करताना विहारीला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचे सामन्यानंतर निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता हनुमा विहारीला ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीला मुकावे लागणार आहे. पण एकापाठोपाठ एक खेळाडू जखमी होत असल्याने भारतीय संघासमोरील समस्या वाढण्याची चिन्हे आहेत. आधीच रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव आदी खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारताची चिंता वाढलेली आहे.
दरम्यान, आज आटोपलेल्या सिडनी कसोटीत भारतीय संघ संकटात असताना रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी जबरदस्त भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी चिवट प्रतिकार करत सामना वाचवण्यात यश मिळवले होते.