- व्हीव्हीएस लक्ष्मण
सध्याच्या भारतीय संघाकडून मुसंडीची अपेक्षा होतीच. मात्र वानखेडेवरील पराभवानंतर राजकोटमध्ये बलाढ्य आॅस्ट्रेलियाचा ज्याप्रकारे फडशा पाडला तो ‘टीम इंडिया’च्या लौकिकाला आणि चारित्र्याला साजेसा ठरला.
हे प्रथमच घडले नाही. रोहित आणि शिखर ज्यावेळी फॉर्ममध्ये असतात तेव्हा विजयाचा पाया आपोआप रचला जातो. शिखरने काल मिशेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूपासून धडाका सिद्ध केला. डावखुऱ्या एश्टर एगरविरुद्ध त्याची फटकेबाजीची आक्रमकता स्पष्ट करणारी होती. विराट तिस-या स्थानावर नेहमीसारखा खेळला. त्याने वेगवान धावा काढल्या नाहीत तर शिखरला गरजेनुसार स्ट्राईक दिला. विराटचे हेच वैशिष्ट्य त्याला इतरांपासून वेगळे ठरविणारे आहे.
शिखर शतकापासून वंचित राहिला. तो आणि श्रेयस अय्यर पाठोपाठ बाद होताच वानखेडेसारखी फलंदाजी कोसळते की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र लोकेश राहुलने वनडेतील शानदार खेळी करीत पुन्हा एकदा सावरले. फलंदाजी क्रम खाली-वर होणे सोपे नसते. राहुलने मागच्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सलामीवीर या नात्याने यशस्वी कामगिरी केल्यानंतर येथे काल पाचव्या स्थानावर येऊन कमाल केली. तो या स्थानावर केवळ दुसऱ्यांदा फलंदाजी करीत होता. तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या स्वत:चे स्थान निर्माण करीत शानदार कामगिरी करणे सोपे नसते. त्याचे टायमिंग आणि प्लेसमेंट पाहण्यासारखे होते. नको त्यावेळी चेंडूवर तुटून पडण्याचा आततायीपणा त्याने केला नाही. कव्हरच्या वरून त्याने स्टार्कच्या चेंडूवर मारलेला षटकार डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
३४१ धावांचे आव्हान असे सोपे नव्हते, मात्र भारतापुढे दमदार गोलंदाजी करण्याचे आव्हान होते. जसप्रीत बुमराह याने चार षटकांत नव्या चेंडूवर कमाल केली. विशेषत: सलामीवीर फिंचविरुद्ध त्याने टाकलेले चेंडू अप्रतिम होते. मनीष पांडे याने डेव्हिड वॉर्नरचा घेतलेला सनसनाटी झेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना ठरला. फिंचला बाद करणारे लोकेश राहुलचे स्टम्पिंग हादेखील सामन्यात निर्णायक क्षण ठरला. यानंतरही स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्याकडून धोका कायम होता. पण कुलदीप यादवने स्मिथची दांडी गुल करताच सामना भारताच्या बाजूने झुकला. यानंतरचे काम मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी सोपे केले. दोघांनीही यॉर्कर टाकून पाहुण्या संघाला पराभवाच्या खाईत ढकलले. आता बंगलोरात निर्णायक सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. माझ्या मते जो संघ उत्कृष्ट गोलंदाजी करेल, तोच बाजी मारेल. तशीही चिन्नास्वामीची खेळपट्टी पारंपरिकदृष्ट्या फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. (गेमप्लान)