मालिका विजयासाठी भारताचा बांगलादेशविरुद्ध सावध पवित्रा

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर आज, रविवारी भारताला टी-२० मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:21 AM2019-11-10T03:21:14+5:302019-11-10T06:34:18+5:30

whatsapp join usJoin us
India stand guard against Bangladesh for series win | मालिका विजयासाठी भारताचा बांगलादेशविरुद्ध सावध पवित्रा

मालिका विजयासाठी भारताचा बांगलादेशविरुद्ध सावध पवित्रा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर आज, रविवारी भारताला टी-२० मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. पाहुण्या बांगलादेशकडे गमावण्यासारखे काही नसल्यामुळे १-१ अशा बरोबरीनंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सावध पवित्रा राखूनच विजय साजरा करण्याचे आव्हान यजमान संघापुढे असेल.
कर्णधार विराट कोहली तसेच अन्य काही सीनियर्सच्या अनुपस्थितीत काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा याला विजय मिळविण्यासोबतच आगामी विश्वचषकासाठी प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यावा लागणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांचे फलित म्हणजे फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याचे झालेले यशस्वी पुनरागमन. मधल्या षटकांत गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा आहे. राजकोटच्या दुसºया सामन्यात रोहितची बॅट तळपल्यामुळे भारताने पाहुण्यांना सहज पराभूत केले होते.
चायनामॅन कुलदीपऐवजी संघात आलेला वॉशिंग्टन सुंदर किफायतशीर आहे; पण बळी घेण्यात तो चहलच्या मागे राहिला. वेगवान खलील अहमदने दोन्ही सामन्यांत भरपूर धावा मोजल्याने शार्दुल ठाकूर हा अंतिम ११ जणांत दीपक चाहरसोबत नवा चेंडू हाताळू शकेल. रोहितने पहिल्या दोन्ही सामन्यांत बदल न केल्याने मनीष पांडे, संजू सॅमसन आणि राहुल चाहर हे बाकावरच बसून होते. नागपुरात संधी न मिळाल्यास स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विंडीजविरुद्ध मालिकेची प्रतीक्षा करावी लागेल.
फलंदाजीबाबत बोलायचे तर, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे फटके मारणारे फलंदाज भारतीय संघात नाहीत. श्रेयसने अल्पावधीत स्वत:ला सज्ज केले; पण लोकेश राहुल सतत अपयशी ठरला. युवा अष्टपैलू शिवम दुबे याच्यातील प्रतिभेला न्याय मिळण्याची गरज असेल. शिखर धवन आणि ऋषभ पंत हे स्थान टिकविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
तमीम इक्बाल आणि शाकीब अल हसन संघात नसल्यामुळे भारताला विजयाची संधी असेल. दुसरीकडे बांगलादेशचा २० वर्षांचा लेग स्पिनर अमिनूल इस्लाम याने चार गडी बाद करीत सर्वांचे लक्ष वेधले असून, वेगवान गोलंदाज ताफिजूर रहमान याला मात्र भारतीय फलंदाजांना धडकी भरविण्यात अपयश आले होते. (वृत्तसंस्था)
>बरोबरीची भारताला संधी
बांगलादेशविरुद्ध भारताला टी-२० लढतीत रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी असेल. भारताने येथे तीन सामने खेळले असून, त्यातील दोन गमावले व एक सामना जिंकला. बांगलादेशला हरविल्यास जय-पराजयाचे रेकॉर्ड २-२ करण्याची संधी असेल. २००९ मध्ये भारताविरुद्ध येथे झालेला पहिला टी-२० सामना श्रीलंकेने २९ धावांनी जिंकला. २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध ४७ धावांनी पराभूत व्हावे लागले.भारताला एकमेव सामन्यात विजय मिळाला तो २०१७ ला इंग्लंडविरुद्ध. जसप्रीत बुमराहच्या दमदार माºयाच्या बळावर भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला.
>१५५ धावा आव्हानात्मक असतील : डोमिंगो
बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांच्यामते, येथील खेळपट्टीवर १५५ धावा आव्हानात्मक ठरू शकतील. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना डोमिंगो म्हणाले, ‘जामठ्याच्या खेळपट्टीचा लौकिक कमी धावसंख्येचा राहिला आहे. त्यामुळेच १५५ धावांचे लक्ष्य आव्हानात्मक ठरू शकते. राजकोटमध्ये आमचे फलंदाज शिस्तबद्ध माºयापुढे १८५ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. भारताच्या विजयाचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांना जाते. भारताचे गोलंदाज तितके अनुभवी नसले तरी त्यांनी केलेला शिस्तबद्ध मारा निर्णायक ठरला.
>उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर.
बांगलादेश : महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), ताईजूल इस्लाम, मोहम्मद मिथून, लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकूर रहीम, आफिफ हुसेन, मोसादेक हुसेन सेकत, अमिनूल इस्लाम बिप्लब, अराफात सनी, अबू हैदर, अल अमीन हुसेन, मुस्तफिजूर रहमान आणि शफी उल इस्लाम.

Web Title: India stand guard against Bangladesh for series win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.