ढाका: आशियाई क्रिकेट परिषदेच्या इमर्जिंग चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतावर तीन गडयांनी मात करत अंतिम फेरी गाठली.
पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज ओमेर युसूफ (६६) व हैदर अली (४३) यांनी पहिल्या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर सईद बाबर (४७), कर्णधार रोहेल नजीर (३५) व इमरान रफीक (२८) यांच्या फलंदाजीमुळे पाकिस्तानने भारतासमोर सात गड्यांच्या मोबदल्यात २६७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून जलदगती गोलंदाज शिवम मावी, ऋत्विक शौकिन व सौरभ दुबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारतानेही आपली सुरुवात दमदार केली. रवी शरत (४७ ) व आर्यन जुयाल (१७) यांनी ३८ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. जुआल बाद झाल्यानंतर सणवीर सिंग याने ९० चेंडूत ७६ धावा करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शरत व सणवीर बाद झाल्यानंतर अरमान जाफर (४६) व यश राठोड (१३) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. पाच गडी शिल्लक असतानाही भारताला विजय सहज साध्य होता. भारताने ३८.१ षटकात पाच बाद २११ धावा केल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकात विजयासाठी सात धावा आवश्यक असताना भारताला चारच धावा काढता आल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ५० षटकांत सर्व बाद २६७ धावा ( ओमर युसूफ ६६, हैदर अली ४३, रोहेल नजीर ३५, सैफ बादर नाबाद ४७ ; मावी २/५३, दुबे २/६०,शौकिन २/५६).
भारत : ५० षटकांत ८ बाद २६४ धावा (रवी शरत ४७, जुआल १७, सणवीर सिंग ७६, सुतार नाबाद २८; हुसेन २/६१, बादर २/५७)