Shubman Gill Fitness Update, IND vs SA 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याची आशा शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, कारण संघ व्यवस्थापन तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही याची वाट पाहत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाल्यापासून शुभमन गिलने सराव सत्रात भाग घेतला नाही. त्याच्या अनुपस्थितीत भारताला पहिल्या कसोटीत संघर्ष करावा लागला. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, परंतु तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
फलंदाजी प्रशिक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट
गुरुवारी सराव करण्यापूर्वी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी या प्रकरणावर एक मोठी माहिती दिली. ते म्हणाले, "तो निश्चितच बरा होत आहे, कारण मी काल त्याला भेटलो होतो. वैद्यकीय टीम त्याच्यावर कुठलाही ताण पडू नये यासाठी प्रयत्नशील आहे. उद्या संध्याकाळी याबाबत निर्णय घेतला जाईल, कारण फिजिओ आणि डॉक्टरांना हे ठरवायचे आहे की, जरी तो पूर्णपणे बरा झाला तरी सामन्यादरम्यान पुन्हा त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे की नाही. त्यानंतर त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल."
![]()
गिल नसला तरीही...
कोटक यांनी स्पष्ट केले की संघ व्यवस्थापन कर्णधाराच्या आरोग्याबाबत कुठलाही धोका पत्करणार नाही. जर काही शंका असतील तर तो दुसऱ्या सामन्यासाठी विश्रांती घेईल. शुबमनसारखा खेळाडू प्रतिभावान आहे. तसेच, तो कर्णधारही आहे. असा खेळाडू कोणत्याही संघात नसेल तर त्याची कमतरता नक्की जाणवेल. पण संघ कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. जर गिल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला तर संघाकडे पुरेसे चांगले खेळाडू आहेत.