IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : क्रिकेटच्या पंढरीत रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १४३ धावा लावल्या आहेत. आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्यावर लोकेश राहुलच्या अर्धशतकासह रिषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात उतरला ही गोष्ट टीम इंडियासाठी मोठा दिलासा देणारी होती. भारतीय संघ अजूनही २४२ धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी केएल राहुल आणि रिषभ पंत या जोडीकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी स्वस्तात माघारी, करुण नायर पुन्हा संधीच सोनं करण्यात ठरला अपयशी
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाला पहिल्या डावात ३८७ धावांवर रोखल्यावर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर अवघ्या १३ धावा असताना यशस्वी जैस्वालच्या रुपात जोफ्रा आर्चनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. तो ८ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १३ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या करुण नायरनं केएल राहुलसोबत ६१ धावांची खेळी केली. पण सेट झाल्यावर तोही बेन स्टोक्सच्या जाळ्यात अडकला.
IND vs ENG : बुमराहचा 'पंजा'; दमवणाऱ्या दोघांना सिराजनं केलं 'अरेस्ट'! इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांत आटोपला
शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का
इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या डावात तो मोठी खेळी करुन आपल्या फलंदाजीतील धमक दाखवण्यात कमी पडला. त्याने ६२ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय कर्णधाराला क्रिस वोक्सनं १६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. हा टीम इंडियासाठी मोठा धक्काच होता. शुबमन गिलनं पहिल्या कसोटी सामन्यातील शतकानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात द्विशतक अन् दुसऱ्या डावात शतकी खेळी साकारली होती. पण लॉर्ड्सच्या मैदानात पहिला सामना खेळताना तो स्वस्तात तंबूत परतला.
आता केएल राहुल अन् पंतवर मोठी जबाबदारी
पहिल्या ३ विकेट्स गमावल्यावर सलामीवीर लोकेश राहुलनं संयमी खेळी करत अर्धशतकी खेळी केली. दिवसाअखेर तो ११३ चेंडूचा सामना करून ५३ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला दुखापतीमुळे मैदान सोडून गेलेल्या रिषभ पंत बॅटिंगला येणार की, नाही असा मोठा प्रश्न होता. कर्णधार शुबमन गिलची विकेट पडल्यावर उप कर्णधार रिषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात उतरला. ३३ चेंडूत नाबाद १९ धावांची खेळी करत त्याने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला आहे. दुसऱ्या दिवसाअखेर ३ विकेट्स गमावल्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर असून पिछाडी भरून काढून सामन्यात कमबॅक करण्यासाठी या जोडीवर आता मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी असेल.
Web Title: IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps India Behind By 242 Runs And England Having Taken 3 Wickets Now Eyes On KL Rahul And Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.