लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाला नमवल्यानंतर भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतून थोडी विश्रांती घेण्याचा वेळ मिळाला आहे. भारतीय संघाचा पुढील मुकाबला 22 जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे. याच सामन्यात टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा लंडनला पोहोचली आहे. कर्णधार विराट कोहलीसह अनुष्का लंडनमध्ये फिरताना दिसली. सोशल मीडियावर विरुष्काचा फोटो व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या चाहत्यानं तो फोटो पोस्ट केला, यात अनुष्का नव्या हेअरकटमध्ये दिसत आहे.
भारत-पाकिस्तान लढतीत हिटमॅन रोहित शर्माचा करिष्मा पाहायला मिळाला. रोहितनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची मालिका सातव्या सामन्यातही कायम राखत भारतीयांनी चाहत्यांना फादर्स डे ला मोठी भेट दिली. मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या.
![]()
बीसीसीआयच्या नियमानुसार वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या 20 दिवसांनंतर खेळाडूंना त्यांच्या पत्नींना बोलवण्याची मुभा दिली होती. शिखर धवननेही सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबतचा, तर रोहित शर्मानेही रितिका सजदेहसोबतचा फोटो पोस्ट केला होता.