Helps relieve players' pressure - Anil Kumble | खेळाडूंवरील दडपण दूर करायला मदत करणार - कुंबळे

खेळाडूंवरील दडपण दूर करायला मदत करणार - कुंबळे

नवी दिल्ली : ‘टीम इंडियाचा प्रशिक्षक या नात्याने मी माझ्या अनुभवात कुठली मोठी भर पाडली असेल तर खेळाडूंवरील दडपण कमी केले शिवाय त्यांना सहज वागण्यास मदत केली,’ असे दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी म्हटले.
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबतचे संबंध विकोपाला गेल्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या काळात भारताने यशस्वी कामगिरी केली होती. ४८ वर्षांचे कुंबळे पुन्हा एकदा कोचच्या भूमिकेत पुढे आले. ते सध्या आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचे क्रिकेट संचालन संचालक आहेत. याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि मुंबई इंडियन्सचे ते मेंटर होते.
बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना कुंबळे म्हणाले,‘आरसीबीसोबत असताना जेतेपद पटकविण्यात दोनदा अपयश आले. मुंबईसोबत तीन वर्षे असताना यश मिळाले. हा अनुभव शानदार ठरला. कोच या नात्याने परिपक्व होण्यास मदत झाली. क्रिकेटचे सोपेपण होत असेल तर अनेक बाबी सोप्या होत जातात. निकाल, चषक आणि ट्रॉफी जिंकण्याला महत्त्व दिले की खेळाडूंवर अधिक दडपण येते. त्यामुळेच मी दडपण मुक्त राहण्यास महत्त्व दिले. खेळाडूंना सहज राहण्यास मदत केली. खेळाडू सहज होऊन खेळले की अधिक चांगली कामगिरी करतात, असा माझा अनुभव आहे.’
किंग्स इलेव्हन पंजाब अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकवू शकलेला नाही. कुंबळे हे जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी संघासोबत जुळले आहेत. संघात अधिक अनुभवी खेळाडूंचा भरणा असावा असे त्यांना वाटते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएल लिलावासाठी ते लवकरच डावपेच आखणार असल्याची माहिती आहे. याबाबत कुंबळे पुढे म्हणाले,‘खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्याने आपल्याकडे काही अनुभव असतो. याच अनुभवाच्या बळावर आपण काही शिकत असतो. स्वत:वर संयम राखून खेळाडूंच्या पाठिशी उभे राहणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य ठरते. ’ नेतृत्व कोण करेल, याचा निर्णय देखील आम्ही अद्याप घेतला नाही.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Helps relieve players' pressure - Anil Kumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.