नवी दिल्ली: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. लहान मूल मोठं होऊन काय करेल याचा अंदाज बालपणीच येत असतो. चेन्नई सुपर किंग्सनं IPL 2021 च्या लिलावात खरेदी केलेला २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हरिशंकर रेड्डीच्या बाबतीत हे शब्द खरे ठरताना दिसत आहेत. आयपीएलसाठी सराव करतानाच रेड्डीनं त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. रेड्डीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सीएसकेचा संघ पहिल्यांदाच बाद फेरी गाठू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमासाठी सीएसकेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. सीएसकेचे खेळाडू सध्या मैदानात घाम गाळत आहेत. सीएसकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या हरिशंकर रेड्डीनं त्याच्या अचूक टप्प्यानं सगळ्यांनाच चकित केलं. विशेष म्हणजे रेड्डीनं सरावादरम्यान संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा त्रिफळा उडवला.
आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी सीएसकेनं २० लाखांच्या बेस प्राईजवर हरीशंकर रेड्डीला आपल्या ताफ्यात घेतलं. सध्या रेड्डी संघाच्या इतर खेळाडूंसह नेट्समध्ये सराव करत आहे. रेड्डीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेड्डीनं धोनीचा बचाव भेदत त्याचा त्रिफळा उडवला आहे. विशेष म्हणजे लेग स्टंम्प बराच लांब जाऊन पडला आहे. रेड्डीचा वेग आणि अचूक टप्पा तिथे उपस्थित असलेले अनेक जण चकीत झाले.