भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेटचा सामना म्हणजे दोन्ही देशवासीयांसाठी पर्वणीच. उभय देशांमधील द्वंद्व पाहण्याची जेवढी उत्सुकता दोन्ही देशांमधील चाहत्यांना असते तितकीच जगभरातल्या अन्य क्रिकेट रसिकांनाही असते. त्यामुळेच भारत-पाकिस्तान सामना नेहमीच हाऊसफुल स्टेडियमवर खेळवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आणि आशिया कप स्पर्धेत भारत-पाक सामना पाहायला मिळतो. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाक सामना पावसामुळे दोन दिवस लांबला होता.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगही ( आयपीएल 2020) यंदा होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे त्यांना टाईमपास म्हणूनही क्रिकेट पाहता येत नाही. पण, भारतातील अशा क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार अनुभवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत झालेले क्रिकेट सामने पुन्हा पाहता येणार आहेत. तोही प्रत्येक चेंडूसह... स्टार स्पोर्ट्स 1 या वाहीनीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचे पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
केव्हा पाहाता येतील हे सामने ?
4 ते 10 एप्रिल या कालावधीत हे सामना दररोज सकाळी 11 वाजल्यापासून दाखवण्यात येतील
4 एप्रिल - 1992 चा वर्ल्ड कप
5 एप्रिल - 1996 चा वर्ल्ड कप
6 एप्रिल - 1999 वर्ल्ड कप
7 एप्रिल - 2003 वर्ल्ड कप
8 एप्रिल - 2011 वर्ल्ड कप
9 एप्रिल - 2013 वर्ल्ड कप
10 एप्रिल - 2019 वर्ल्ड कप