- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या विजयीपथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला बेसिन रिझर्व्हवरील खराब कामगिरीमुळे निराशा पदरी पडली. पहिल्या डावातील अपयशासाठी काहीअंशी नाणेफेकीचा कौल जबाबदार असेलही, पण दुसऱ्या डावात अपयशाला कारण नाही. न्यूझीलंडने गोलंदाजीत विविधतेसह आखूड टप्प्याच्या माºयाचा शानदार वापर केला. पहिल्या डावात दिशाहीन मारा करणाºया बोल्टने दुसºया डावात टिच्चून चेंडू टाकले. टिम साऊदी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून जेमिसनने पदार्पणात कोहली आणि पुजारा यांना धक्का देत अनेकांचे लक्ष वेधले.
परदेशातील भूमीत भारताच्या विजयात नेहमी बलाढ्य सलामी जोडीचे योगदान मोलाचे ठरले आहे. मात्र पृथ्वी शॉच्या फलंदाजीतील उणिवा येथे चव्हाट्यावर आल्या. त्याला आक्रमकतेवर आवर घालण्याची गरज आहे. त्यासाठी यजमान कर्णधार केन विलियम्सकडून काही शिकता येईल. केनने संयमी खेळी करीत वेगवान आणि उसळी घेणाºया खेळपट्टीवर उत्कृष्ट फलंदाजी केली. पृथ्वी हा सहकारी मयांक अगरवालकडूनही काही बोध घेऊ शकतो.
दुखापतीनंतर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचे शानदार पुनरामन झाले. त्याचे योगदान भारतीय संघासाठी मोलाचे ठरणार आहे. कमी वेळेत थकवा येऊ न देता या वेगवान गोलंदाजाने पाच गडी बाद करीत यजमान न्यूझीलंडला ७ बाद २२५ धावात रोखले होते; नंतर तळाच्या फलंदाजांनी मात्र १८३ धावांची संघाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी भारतासाठी अवघड सिद्ध झाली.
भारतीय संघाला आता दुसºया कसोटी सामन्यात मुसंडी मारण्याची संधी असेल. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना यजमान न्यूझीलंड संघाच्या वेलिंग्टनमधील डावपेचांचा शस्त्रासारखा वापर करावा लागेल. भारतीय संघ यशस्वी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेल, अशी मला अपेक्षा आहे. (गेमप्लान)