लंडन : इंग्लंड क्रिकेट संघाचे वेळापत्रक जूनपासून अत्यंत व्यस्त आहे. या काळात आयपीएलच्या उर्वरित ३१ सामन्यांचे वेळापत्रक नव्याने तयार करण्यात आले तरी आमचे खेळाडू त्यात दिसणार नाहीत, असे ईसीबीचे संचालक ॲश्ले जाईल्स यांनी स्पष्ट केले.
इंग्लिश बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनुकूलता दर्शविली आहे. क्रिकइन्फोशी बोलताना जाईल्स म्हणाले, “आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना सामील करण्याचा विचार करीत आहोत. आम्हाला पूर्ण एफटीपी वेळापत्रक प्राप्त झाले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश दौरा (सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये) वेळापत्रकानुसार झाल्यास की आमचे सर्व खेळाडू तेथे असतील.”
बीसीसीआय सप्टेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलसाठी ‘विंडो’ शोधत आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघ बांगलादेशला भेट देईल. भारताबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर ते पाकिस्तान दौरा करतील. इंग्लिश संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळेल. त्यानंतर इंग्लंड ॲशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल.