ठळक मुद्देइंग्लंडने तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0ने जिंकलीतिसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा संघ सर्व आघाडींवर अपयशी ठरलाजेम्स अँडरसनच्या विक्रमानं ही कसोटी गाजवली
England vs Pakistan 3rd Test : इंग्लंड दौऱ्यावर इतिहास घडवण्यासाठी दाखल झालेल्या पाकिस्तानच्या संघाची लाजीरवाणी अवस्था झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज फार काळ टिकले नाही. त्यात यजमानांच्या फलंदाजांनीही दमदार फटकेबाजी केली आणि तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. तिसऱ्या कसोटीत जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यानं या सामन्यात आतापर्यंत एकाही जलदगती गोलंदाजाला न जमलेला पराक्रम करून दाखवला.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 583 धावांवर पहिला डाव घोषित केला. 22 वर्षीय झॅक क्रॅवलीनं पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. क्रॅवलीनं 393 चेंडूंत 34 चौकार व 1 षटकार खेचून तब्बल 541 मिनिटं खेळपट्टीवर चिकटून बसला आणि 267 धावांची विक्रमी खेळी केली. मालिकावीर जोस बटलरची त्याला दमदार साथ मिळाली. त्यानंही 311 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 152 धावा चोपल्या. ख्रिस वोक्सनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेताना 40 धावांची खेळी केली.
पाकिस्तानला हा भार पेलवला नाही आणि त्यांचा पहिला डाव 273 धावांवर गडगडला. कर्णधार अझर अली ( 141) आणि मोहम्मद रिझवान ( 53) यांचा अपवाद वगळले, तर पाकिस्तानचे सर्व फलंदाजांनी इंग्लंडसमोर लोटांगण घातले. जेम्स अँडरसननं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कसोटीती पाच विकेट्स घेण्याची त्याची ही 29वी वेळ ठरली. त्याल स्टुअर्ट ब्रॉडची ( 2) साथ लाभली. फॉलोऑन मिळालेल्या पाकिस्तानची दुसऱ्या डावातही तारांबळ उडाली. हा सामना पाकिस्तान डावाने पराभूत होईल, असेच चित्र होते. पण, पावसानं त्यांची इभ्रत वाचवली. अबीद अली (42), बाबर आझम ( 63*) यांनी संघर्ष केला.
पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. पाकिस्ताननं 4 बाद 187 धावा केल्या होत्या. या सामन्यात जेम्स अँडरसननं कर्णधार अझर अलीची विकेट घेत विक्रमाला गवसणी घातली. कसोटीत 600 विकेट्स घेणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप फाईव्ह गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका ) 133 सामने व 800 विकेट्स
शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया) 145 सामने व 708 विकेट्स
अनिल कुंबळे ( भारत) 132 सामने व 619 विकेट्स
जेम्स अँडरसन ( इंग्लंड ) 156 सामने व 600 विकेट्स
ग्लेन मॅक्ग्राथ ( ऑस्ट्रेलिया) 124 सामने व 563 विकेट्स