England Batsmen Dawid Malan attains highest-ever rating points in T20I history, reached 915 points | इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ट्वेंटी-20 इतिहासात नोंदवली भारी कामगिरी

इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानचा वर्ल्ड रेकॉर्ड; ट्वेंटी-20 इतिहासात नोंदवली भारी कामगिरी

इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेविड मलाननं ( Dawid Malan) ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. ICCनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना हा विक्रम केला. मंगळवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात मलाननं नाबाद ९९ धावांची खेळी करताना इंग्लंडला विजय मिळवून दिला. मलाननं ४७ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह ही खेळी साकारताना आफ्रिकेचे १९२ धावांचे लक्ष्य सहज पार केले. या विजयाबरोबर इंग्लंडनं ट्वेंटी-20 क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केलं. 

मलाननं सप्टेंबर महिन्यात फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते आणि या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने १७३ धावा केल्या. आयसीसी ट्वेंटी-20 क्रिकेट फलंदाजांच्या  क्रमवारीत ९०० गुणांचा पल्ला पार करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी जुलै २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं ९०० गुण नावावर जमा करताना विक्रम नोंदवला होता, परंतु मलाननं हा पल्ला ओलांडून एक नवा विश्वविक्रम नावावर केला.
 


त्यानं पाकिस्तानचा बाबर आझमला मागे टाकले. मलान ९१५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर आझमच्या खात्यात ८७१ गुण आहेत. अॅरोन फिंच ( ८३५), लोकेश राहुल ( ८२४) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ७४४) अव्वल पाचात आहे. विराट कोहली ( ६७३) आणि रोहित शर्मा ( ६६२) अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानावर आहेत. गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल दहा जणांमध्ये एकही भारतीय नाही. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: England Batsmen Dawid Malan attains highest-ever rating points in T20I history, reached 915 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.