अबुधाबी : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री कार्तिकच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने सनरायजर्सचा ७ गडी राखून पराभव केला, पण स्वत: कर्णधाराला खातेही उघडता आले नाही. या लढतीत समालोचन करीत असलेला इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने संघाचा कर्णधार बदलण्याचा सल्ला दिला. पीटरसनने सामना संपण्यापूर्वी रात्री १०.३६ ला टिष्ट्वट करताना लिहिले, ‘शुभमान गिल केकेआरचा कर्णधार असायला हवा.’ या युवा खेळाडूने ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
चारवेळा शून्यावर बाद
शनिवारी रात्री केकेआरने हैदराबादविरुद्ध ७ गडी राखून शानदार विजय नोंदवला, पण कर्णधार दिनेश कार्तिकची कामगिरी निराशाजनक झाली. त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवल्या गेला. दिनेश कार्तिक शनिवारी शून्यावर बाद झाला आणि आपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत तो पहिल्या स्थानी आला. आतापर्यंत तो चारदा शून्यावर बाद झाला आहे.