भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने सुद्धा धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी धोनीला पाहिले तर मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, असे सानिया मिर्झाने म्हटले आहे.
सानिया मिर्झाने एका मुलाखतीत धोनीच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये धोनीने निरोपाचा सामना खेळावा की नाही, धोनी हा अन्य क्रिकेटपटूंपेक्षा नेमका कसा वेगळा आहे, त्याचबरोबर धोनीला पाहिले की मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, असे सानिया मिर्झाने म्हटले आहे.
धोनीने जर ठरवले असते तर तो आपला निवृत्तीचा सामना खेळला असता. पण धोनीने शांतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. हीच धोनीची गोष्ट सर्वात वेगळी आहे. या गोष्टीमुळेच धोनी हा बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. अशा काही गोष्टीच धोनीला कॅप्टन कूल बनवतात, असे सानिया मिर्झाने म्हटले आहे. याशिवाय, धोनीने स्वत:साठी नाही तर देशासाठी बरेच काही केले आहे. देशाला बऱ्याच गोष्टी धोनीने मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे धोनीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, असे सानिया मिर्झाने म्हटले आहे.
याचबरोबर, धोनीची तुलना सानिया मिर्झाने आपला पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याबरोबर केल्याचे दिसून येते. सानिया मिर्झा म्हणाली, " धोनीला पाहिले की मला माझ्या नवऱ्याची आठवण होते. कारण, धोनी आणि शोएब यांची पर्सनॅलिटी सारखीच आहे. तसेच, धोनी आणि शोएबमध्ये बरेच गुण सारखे आहेत. त्यांच्यामध्ये बरीच समानता आहे. मैदानातही धोनी आणि शोएब नेहमीच शांत राहिला आहे. त्यामुळे धोनी हा काही गोष्टींमध्ये शोएबसारखाच आहे."
दरम्यान, जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. तसेच, या व्हिडीओला 'मैं पल दो पल का शायर हूँ,' हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. "तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे," अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे.
याचबरोबर, ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धोनीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या. फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही त्याने भारतीय संघाला भरभरून योगदान दिले. यष्टीरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, तर वनडेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.