विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ दरम्यान, बिहारने स्पर्धेच्या इतिहासात धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय मिळवला, तर कर्नाटकने ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. कर्णधार इशान किशनच्या १२५ धावांच्या शतकाच्या जोरावर झारखंडने ५० षटकांत ४१२ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कर्नाटकने ५ विकेट्स गमावून ४७.३ षटकांत हे लक्ष्य गाठले. कर्नाटकच्या विजयात देवदत्त पडिक्कलने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने १४७ धावा केल्या.
झारखंडविरुद्धच्या विजयासह कर्नाटकच्या संघानी विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही केला. यासह कर्नाटकने १३ वर्षे जुना आंध्र संघाचा विक्रम मोडला. २०१२ मध्ये गोव्याविरुद्ध आंध्रने ३८४ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि ४८.४ षटकांत ६ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. पडिकल व्यतिरिक्त, झारखंडविरुद्धच्या या सामन्यात कर्नाटककडून अभिनव मनोहर आणि ध्रुव प्रभाकर यांनीही चांगली फलंदाजी केली. अभिनवने सहाव्या विकेटसाठी ५६ धावा केल्या, तर, ध्रुवने ४० धावांचे योगदान दिले.
| संघ | धावा | विरुद्ध | वर्ष |
| दक्षिण आफ्रिका | ४३५ | ऑस्ट्रेलिया | २००६ |
| कर्नाटक | ४१३ | झारखंड | २०२५ |
| क्वीन्सलँड | ३९९ | तस्मानिया | २०१४ |
| कराची प्रदेश | ३९२ | सियालकोट | २००४ |
| मिडलसेक्स | ३८८ | डरहम | २०२५ |
| आंध्र | ३८४ | गोवा | २०१२ |
कर्नाटकचा विजय हा लिस्ट-ए क्रिकेट इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. कर्नाटक आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, क्वीन्सलँडने २०१४ मध्ये तस्मानियाविरुद्ध ३९९ धावांचे लक्ष्य गाठले.