Karun Nair Dream Comeback : भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीर-शुबमन गिल जोडीच्या नव्या पर्वाला सुरुवात झालीये. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघात मोठे बदल झाल्याचे दिसून येते. काही नव्या चेहऱ्यांसोबतच "प्रिय क्रिकेट मला आणखी एक संधी हवी.." अशी साद घालणाऱ्या करुण नायरलाही ८ वर्षांनी पुन्हा टीम इंडियात संधी देण्यात आलीये. याआधी २०१८ मध्ये करुण नायर इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पण त्याला बाकावरच बसून परतावे लागले होते. रोहित-विराटच्या कसोटीतील निवृत्तीमुळे निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्यासाठी बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करून दाखवणाऱ्या गड्यावर भरवसा दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२,९७९ दिवसांपूर्वी खेळला होता शेवटचा कसोटी सामना
करुण नायर याने २६ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंजाब क्रिकेट असोसिशनच्या बिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दमदार कामगिरी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ३३ वर्षीय बॅटरने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध धर्मशाला येथील मैदानात अखेरचा कसोटी सामना खेळला होता. २९७९ दिवसांनी आता पुन्हा त्याची कसोटी संघात वर्णी लागलीये.
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
इंग्लंड विरुद्ध नाबाद त्रिशतक
६ कसोटी सामन्यातील ७ डावात एका नाबाद त्रिशतकी खेळीसह ६२.३३ च्या सरासरीसह ३७४ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये त्याने चेन्नईच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या डावात ३०३ धावांची खेळी केली होती. सेहवागनंतर टीम इंडियाकडून कसोटीत शतकी खेळी करणारा तो दुसरा बॅटर आहे. पण त्यानंतर पुढच्या सामन्यात त्याने फक्त २६ काढल्या. अन् तो संघाबाहेर फेकला गेला.
विदर्भामुळे कारकिर्दीला मिळालं नवं वळण
२०२३-२४ च्या हंगामात विदर्भ संघाकडून रणजी खेळताना त्याने आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर होता. पण १० सामन्यातील १७ डावात २ शतकासह ३ अर्धशतकाच्या मदतीने ६९० धावा करून त्याने बीसीसीआय निवडकर्त्यांचे लक्षवेधले. एवढ्यावरच तो थांबला नाही. २०२४-२५ च्या रणजी हंगामात ९ सामन्यातील १६ डावात ४ शतके आणि २ अर्धशतकाच्या मदतीने ५३.९३ च्या सरासरीने ८६३ धावा करत सातत्यपूर्ण कामगिरीची हमी देणारी कामगिरी करून दाखवली.
रोहित-विराटनं निवृत्ती घेतली अन् त्याचा कमबॅकचा मार्ग झाला मोकळा
विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ च्या हंगामात करुण नायर याने ६ सामन्यात ६६४ धावा केल्याचे पाहायला मिळाले. यातील ५४२ धावांपर्यंत त्याने एकदाही आपली विकेट फेकली नाही. यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये नाबाद सर्वाधिक धावा करण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर टीम इंडियात त्याची वर्णी लागेल, याची चर्चा रंगली. पण इंग्लंड दौऱ्यावर त्याला संधी मिळेल याची गॅरेंटी नव्हतीच. या दौऱ्याआधी रोहित पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेतली. इंग्लंडमधील कठीण परिस्थितीत हा गडी कामी येईल, या आशेनं अखेर बीसीसीआयने त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.
Web Title: Dear Cricket Give Me One More Chance Karun Nair Dream Comeback To India Test Team After 2979 Days Selected For England Tour 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.