Curious about the Indian team's response against Bangladesh | बांगलादेशविरूद्ध भारतीय संघाच्या प्रत्युत्तराची उत्सुकता

बांगलादेशविरूद्ध भारतीय संघाच्या प्रत्युत्तराची उत्सुकता

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध नवव्या प्रयत्नात प्रथमच यशाची चव चाखणारा बांगलादेश संघ व मुशफिकूर रहीम यांना विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. टी२० मध्ये सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान संघालाही मोठा बोध घ्यावा लागेल. विशेषत: बांगलादेशविरुद्ध नवी दिल्ली येथे व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेंगळुरू येथे फलंदाजीसाठी विशेष अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारताना डावाची उभारणी योग्य पद्धतीने करायला हवी. तसेच जम बसलेल्या फलंदाजाने १७ किंवा १८ व्या षटकापर्यंत तळ ठोकत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून द्यायला हवी. भारताच्या बाबतीत मात्र हे घडले नाही.

टी२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंनी प्रत्येक लढत मुख्य स्पर्धेची रंगीत तालीम असल्याचे मानायला नको. त्यामुळे दडपण येते व त्यांना नैसर्गिक खेळ करता येत नाही. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी चुणूक दाखविली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
बांगलादेशचा युवा लेग स्पिनर अमिनूल इस्लामने प्रभावित केले. चेंडूला उंची देण्याचे धैर्य त्याने दाखविले. त्यामुळे राहुल व श्रेयस यांना बाद करण्यात त्याला यश आले. कृणाल पांड्या व वॉशिंग्टन सुंदर यांच्यामुळे भारताला १४८ धावांची मजल मारता आली. टी२० क्रिकेटमध्ये ते फलंदाजीवर अधिक मेहनत घेत असल्याचे दिसून येते आहे. गोलंदाजी करताना भारतीय संघ वरचढ होता, पण मुशफिकूर रहीमच्या शानदार फलंदाजीने पारडे बांगलादेशच्या बाजूने झुकले. शाकिब-अल-हुसेनच्या अनुपस्थितीत बांगलादेशसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाजीला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा त्याने धडा दिला. फिरकीपटूंविरुद्ध त्याने परंपरागत व रिव्हर्स स्विपचा वापर केला. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याने चेंडू उशिराने खेळले. मुशफिकूरला नशिबाचीही साथ लाभली. एकदा कृणालने त्याचा झेल सोडला, तर एकदा भारताने त्याच्याविरुद्ध रिव्ह्यूचा वापर केला नाही. पण, त्याची फलंदाजी शानदार होती.
टी२० पुनरागमनामध्ये चहल भारताचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला. पण मुशफिकूरने खलील अहमदच्या डावातील १९ व्या षटकात चार चौकार वसूल करीत बांगलादेशचा विजय निश्चित केला. बांगलादेशने सलामी लढतीत शानदार कामगिरी करीत विजय मिळवला असून, आता राजकोट येथे भारतीय संघ कसे प्रत्युत्तर देतो, याची उत्सुकता आहे.

Web Title: Curious about the Indian team's response against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.