Corona wants to win as 'Team India'; PM Narendra Modi's players appeal | कोरोनावर ‘टीम इंडिया’च्या रूपाने विजय मिळवायचा आहे; नरेंद्र मोदींचे खेळाडूंना आवाहन

कोरोनावर ‘टीम इंडिया’च्या रूपाने विजय मिळवायचा आहे; नरेंद्र मोदींचे खेळाडूंना आवाहन

नवी दिल्ली: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. आता ही संख्या अडिच हजारांवर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. देशात सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे दिग्गज खेळाडूंसोबत संवाद साधला. विराट कोहली, पी.व्ही. सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंना आवाहन करीत टीम इंडियाच्या रूपाने कोरोनावर भारताला मात करायची असून त्यासाठी लोकांचे मनोबल वाढवा, अशी साद घातली.

पंतप्रधानांनी कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी शुक्रवारी सकाळी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह बीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, हिमा दास, पी.व्ही. सिंधू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत चर्चा केली. यावेळी खेळाडूंनी काही सूचना केल्या. मोदी यांनी या सूचनांकडे पूर्ण लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

‘संकल्प, संयम, सकारात्मकता, सन्मान आणि सहयोग’ या पंचसूत्रीच्या बळावर नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करा, असे आवाहन मोदी यांनी खेळाडूंना केले. बैठकीदरम्यान कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांनी क्रीडाविश्वाची साथ मागितली आणि त्यांच्याशी कोरोनाच्या प्रभावाबाबत चर्चा केली.

मोदी म्हणाले, ‘तुमचे विचार पूर्णपणे लक्षात घेतले जातील. कोरोनाविरुद्ध जागतिक लढाईत टीम इंडियाच्या रूपाने भारताला विजयी करायचे आहे. आम्हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर देशात नव्या उर्जेचा संचार होईल, असा मला विश्वास आहे.’

क्रीडा मंत्रालयाने माहिती देताना एक तास चाललेल्या या चर्चेत खेळाडूंनी काही सूचना केल्या. मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या योगदानाचे कौतुक केल्याचे सांगितले. आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने टिष्ट्वट केले, ‘पंतप्रधानांंनी खेळाडूंसोबत चर्चा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याचे आणि कोरोनाबाबत जागरुकता पसरविण्याचे आवाहन केले.’

महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने बेंगळुरुस्थित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या शिबिरात कोरोना व्हायरसबाबत घेण्यात येणाऱ्या काळजीची माहिती मोदी यांना दिली. चर्चेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि युवरराजसिंग या क्रिकेटपटूंचा देखील समावेश होता.

विश्वचषक विजेत्या संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि लोकेश राहुल यांचेही नाव यादीत होते, मात्र दोघेही सहभागी होऊ शकले नाहीत. क्रिकेटपटूंसोबतच भालाफेकपटू नीरज चोप्रा, नाामवंत बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, धावपटू हिमा दास, बॉक्सर एमसी मेरीकोम आणि अमित पंघाल, मल्ल विनेश फोगाट आणि युवा नेमबाज मनु भाकर आदींनी व्हिडिओकॉन्फ्रन्सिंगद्वारे संवाद साधला. 

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याने दु:खी - हिमा

पोलीस आणि आरोग्य कर्मचाºयांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मी दु:खी असल्याचे भारताची धावपटू हिमा दास हिने सांगितले. हिमा ही आसाम पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहे. तिने यावेळी इंदूर आणि गाझियाबादच्या घटनांचा उल्लेख करताना म्हटले की,‘ या हल्ल्यांंमुळे मला दु:ख झाले. हल्ला करणारे लॉकडाऊनचे पालन करत नाहीत.’

लॉकडाऊन संपल्यावर निश्चिंत होऊ शकत नाही - तेंडुलकर

नवी दिल्ली : १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यावर कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत आम्ही निश्चिंत होऊ शकत नाही. त्यानंतरची वेळ कोरोना विरोधात लढण्यासाठी आणखी महत्त्वाची असेल, या माझ्या मताला पंतप्रधानांनी आणखी मजबुती दिल्याचे सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे.

भारताचा महान फलंदाज तेंंडुलकर हा त्या ४० खेळाडूंपैकी एक आहे. ज्यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी एक तास व्हिडिओकॉलवर चर्चा केली. भारतात आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
सचिन तेंडुलकर याने एका वक्तव्यात म्हटले की, मोदी यांनी माझ्या या धारणेला आणखी मजबुत केले. आम्ही लॉकडाऊन संपल्यावर देखील निश्चिंत राहू शकत नाही. त्यानंतरची वेळ देखील खूप महत्त्वाची असेल.’

भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या सचिन याने म्हटले की, मी हे देखील म्हटले आहे की, जोपर्यंत शक्य आहे. तोपर्यंत मी याचप्रकारे संवाद साधेल. महामारीतून बाहेर आल्यानंतर देखील.’

मास्टरब्लास्टर पुढे म्हणाला की, या वेळेत वृद्धांसोबत घालवला पाहिजे. त्यांचे अनुभव ऐकले पाहिजे. त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर लक्ष दिले पाहिजे. आम्ही एक संघ असल्याची भावनेसोबतच काम केले पाहिजे.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona wants to win as 'Team India'; PM Narendra Modi's players appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.