मुंबई : ‘प्रशासकांच्या समितीला (सीओए) बीसीसीआयच्या दैनंदिन कामकाजात हित जोपासण्याचा मुद्दा लागू करण्याबाबत अडचणींना सामोरे जावे लागत आहे,’ अशी कबुली सीओएच्या सदस्य डायना एडुल्जी यांनी दिली. त्यामुळे आता ‘श्वेतपत्रिका’ तयार करण्यात येईल असे, त्यांनी म्हटले.
एडुल्जी व त्यांचे सहकारी लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) रवी थोडगे यांनी माजी राष्ट्रीय कर्णधार दिलीप वेंगसरकर व सौरव गांगुली (स्काईपच्या माध्यमातून) यांच्यासह माजी व विद्यमान क्रिकेटपटूंची भेट घेतली व लोढा समितीच्या वादग्रस्त नियमामुळे येत असलेल्या अडचणींवर चर्चा केली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंना हित जोपासण्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले आणि बीसीसीआयचे लोकपाल व नैतिक अधिकारी न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) डी. के. जैन यांनी याआधी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
बैठकीमध्ये संजय मांजरेकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, अजित आगरकर आणि रोहन गावस्कर हेसुद्धा सहभागी झाले होते. बैठकीनंतर एडुल्जी म्हणाल्या, ‘सर्व मुद्यांवर (हित जोपासण्याबाबत जुळलेले) चर्चा करण्यात आली. क्रिकेटपटूंना काय अडचण भासत आहे, लागू करण्यासाठी आम्हाला (प्रशासकांना) कुठल्या अडचणी आहेत, या मुद्यांवर उपयुक्त चर्चा झाली.’
थोडगे यांनीही एडुल्जी यांच्या सुरात सूर मिसळताना म्हटले की, ‘काही वास्तविक अडचणी असून त्यांना आपल्या क्रिकेटपटूंना सामोरे जावे लागत आहे. काही बाबतीत आम्ही सहमत असू शकत नाही. पण काही बाबतीत मात्र आम्हाला सहमत व्हावे लागेल. आम्ही त्यांच्याकडून याच मुद्यावर माहिती घेण्यास इच्छुक होतो. बैठकीचा हाच उद्देश होता. क्रिकेटपटूंना हित जोपासण्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले असून, आम्ही त्यांच्या अडचणींवर चर्चा करीत आहोत.’
‘सध्या तरी पूर्ण पालन करावे लागेल’
बीसीसीआयच्या घटनेनुसार, ‘एक व्यक्ती एक पद’ असायला हवे व याचे उल्लंघन म्हणजे हित जोपासण्याचा मुद्दा उपस्थित होतो. एडुल्जी म्हणाल्या, ‘गांगुलीने स्काईपद्वारे मत मांडले. चांगल्या सूचना आल्या. आम्ही श्वेतपत्रिका काढणार असून ती न्यायमित्रापुढे ठेवू. ते सर्वोच्च न्यायालयाला सोपवतील.’ श्वेतपत्रिकाद्वारे वाचकांना जटील मुद्यांबाबत स्पष्ट माहिती मिळते. ‘सध्या तरी हित जोपासण्याच्या मुद्याच्या नियमाचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे,’ असेही एडुल्जी म्हणाल्या.