चेन्नई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनी भारतासाठी पुन्हा खेळो अथवा न खेळो, तथापि, २0२१ मध्ये आयपीएल लिलाव प्रक्रियेदरम्यान चेन्नई सुपरकिंग्जद्वारे त्याला संघात पुन्हा कायम ठेवले जाईल, असे सांगितले.
बीसीसीआयच्या केंद्रीय करारात दोन वेळेसचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधाराला स्थान दिले गेले नाही. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या निवृत्तीविषयी अफवांना जोर आला आहे. तथापि, धोनी आपल्या फ्रँचाइजीसाठी खेळणे कायम ठेवेल हे भारतीय सीमेंट्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवासन हे एका कार्यक्रमात म्हणाले, ‘‘धोनी केव्हा निवृत्ती घेईल, तो कधीपर्यंत खेळेल आदी लोक चर्चा करतात. तथापि, तो या वर्षी खेळेले हे मी आपल्याला आश्वासन देऊ शकतो. पुढील वर्षी ते लिलाव प्रक्रियेत सहभागी असेल आणि त्याला रिटेन केले जाईल याविषयी माझ्या मनात कोणतीच शंका नाही.’’
धोनी २00८ मध्ये आयपीएलचे उद्घाटन झाल्यापासून सीएसके संघात आहे आणि जेव्हा फ्रँचाइजीला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते तेव्हा तो त्यांच्यासाठी खेळला नव्हता. या यष्टिरक्षक फलंदाजाने संघाचे नेतृत्व करताना तीन वेळेस सीएसकेला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.
बीसीसीआयने गुरुवारी केंद्रीय करार करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीतून धोनीला बाहेर केले. त्यामुळे भारताच्या या माजी कर्णधाराच्या भविष्याविषयी संशय निर्माण झाला. धोनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकात उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर खेळला नाही. धोनी नुकतेच झारखंड संघासोबत नेटमध्ये ट्रेनिंग आणि फलंदाजी करताना आढळला. तो केंद्रीय करारात अ श्रेणीत होता व या श्रेणीत एका खेळाडूला वार्षिक रिटेनरशीपच्या रुपात पाच कोटी रुपये मिळतात.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकले दोन विश्वचषक
भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या नावांपैकी एक धोनीने संघाचे नेतृत्व करताना देशाला दक्षिण आफ्रिकेत २00७ मध्ये विश्व टी-२0चे विजेतेपद मिळवून दिले आणि घरच्या मैदानावर २0११ मध्ये विश्वचषक जिंकून दिला आहे.
या अनुभवी खेळाडूने भारतासाठी ९0 कसोटी, ३५0 एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२0 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत व त्यात १७ हजारांपेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. त्याने यष्टिपाठीमागे ८२९ बळी घेतले आहेत.