भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडणार आहे. विवाह समारंभाच्या विविध विधींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच, या दोघांच्या लग्नापूर्वी झालेल्या एका खास क्रिकेट मॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्री-वेडिंग फंक्शनचा भाग म्हणून, स्मृती आणि पलाश यांच्या टीममध्ये एक मजेदार क्रिकेट सामना खेळवण्यात आला. क्रिकेटने आपल्या जीवनात खास स्थान असलेल्या स्मृतीसाठी ही मॅच म्हणजे अविस्मरणीय भेटच ठरली.
कोणत्या टीमने जिंकली मॅच?
वधूचा संघ : या संघाचे नेतृत्व स्वतः स्मृती मानधना करत होती. तिच्या टीममध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंह आणि ऋचा घोष यांसारख्या भारतीय संघातील तिच्या जवळच्या मैत्रिणींचा समावेश होता.
वराचा संघ : याचे नेतृत्व संगीतकार पलाश मुच्छल यांनी केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पलाशने नाणेफेक जिंकल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. संपूर्ण सामन्यात मजामस्तीचे आणि उत्साहाचे वातावरण होते. मात्र, व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये स्मृतीच्या टीमच्या खेळाडूंनी स्टम्प्स हवेत उंचावून आनंद साजरा केल्याचे दिसत आहे, म्हणजेच वधूच्या टीमने हा खास सामना जिंकला आहे.
हळदी आणि मेहंदीच्या समारंभाचे व्हिडिओही खूप व्हायरल होत आहेत, ज्यात टीम इंडियातील खेळाडूंनी जबरदस्त डान्स करून आनंद साजरा केला. स्मृती आणि पलाशच्या लग्नाचे हे आगळेवेगळे प्री-वेडिंग सेलिब्रेशन क्रिकेट आणि संगीत क्षेत्रातील चाहत्यांसाठी एक खास मेजवानी ठरत आहे.