मुंबई : ‘जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबतच्या चिंतेमुळे संघाला दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्सकडून अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व धवल कुलकर्णी असा ट्रेड करण्यासाठी प्रेरित करावे लागले,’ असे माजी वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहीर खानने सोमवारी स्पष्ट केले.
हार्दिकला पाठीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर शस्त्रक्रिया करावी लागली. बुमराहसुद्धा पाठदुखीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. झहीर खानने पोस्ट केलेल्या व्हीडीओ संदेशामध्ये म्हटले की, ‘खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येमुळे आमच्यासाठी आयपीएलचे आगामी सत्र आव्हानात्मक ठरणार आहे. हार्दिकला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली तर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. जेसन बेहरेनडार्फ हादेखील अशाच प्रकारच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. खेळाडूंच्या ट्रेडदरम्यान आमच्यासाठी चिंतेची बाब होती. आम्हाला वाटले की संघाची गोलंदाजी विभाग मजबूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड केले.’ आयपीएल २०२० च्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकातामध्ये खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन होईल. (वृत्तसंस्था)