रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-20 मालिकेत बांगलादेशवर 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेनंतर दीपक चहर आणि श्रेयस अय्यर यांनी आयसीसीच्या ट्वेंटी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतली. बांगलादेशविरुद्ध 7 धावांत 6 बळी घेत विश्वविक्रम करणारा भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने 88 स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या क्रमवारीत 42 व्या स्थानी कब्जा केला. रोहित शर्मानं फलंदाजांत सातवे स्थान कायम राखले आहे. पण, एक धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. ट्वेंटी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रोहित आणि कर्णधार विराट कोहलीनं टीम इंडियाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही मागे टाकले आहे. होय हे खरं आहे.


अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं आयसीसी ट्वेंटी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 339 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल 333 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार विराट हा या क्रमावारीत भारताकडून अव्वल असलेला खेळाडू ठरला आहे. कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या डी'आर्सी शॉर्टसह संयुक्तपणे 22व्या स्थानावर आहे. त्यानंतर कृणाल पांड्याचा ( 41 ) क्रमांक येतो. हार्दिक पांड्या हा भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असला तरी तो या क्रमावारीत 58 व्या स्थानावर आहे. हिटमॅन रोहितही त्याच्यापेक्षा आघाडीवर आहे. तो 75 गुणांसह 48व्या स्थानावर आहे. 

रोहितनं 2012च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरची गोलंदाजी केली होती. त्यात त्यानं एका षटकात 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर रोहितनं गोलंदाजी केलेली नाही. विराटनंही 2016मध्ये 1.4 षटकं टाकली होती.  ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीचा तो सामना होता. हार्दिक दुखापतीमुळे सध्या विश्रांतीवर आहे, परंतु या आकडेवारीनं सर्वांना आश्चर्य वाटत आहे. 

गोलंदाजांत कोण अव्वल?
न्यूझीलंडचा मिशेल सँटनर अफगाणिस्तानच्या राशिद खाननंतर दुसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. भारताच्या अन्य गोलंदाजांमध्ये कृणाल पांड्याने (संयुक्त 18 व्या) सहा, यजुवेंद्र चहलने (25 व्या) नऊ व वाशिंग्टन सुंदरने (27 वे स्थान) 21 स्थानांची प्रगती केली आहे. 

फलंदाजांत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल
रोहित तो सातव्या स्थानी कायम असून लोकेश राहुल आठव्या स्थानी पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करीत असलेल्या शिखर धवनची 12 व्या, मालिकेत न खेळणारा विराट कोहलीची 15 व्या आणि फॉर्मात नसलेला रिषभ पंतची 89 व्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलानने फलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी जागा मिळवली आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आजम अव्वल आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद नईम संयुक्त 38 व्या स्थानी दाखल झाला आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Breaking; Virat Kohli, Rohit Sharma ranked higher than Hardik Pandya in ICC T20I rankings for all-rounders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.