नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन देशात करण्यास प्रथम प्राधान्य असेल आणि हे आयोजन २०२० मध्ये होईल, अशी अपेक्षा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी व्यक्त केली. कोरोना महामारीच्या वाढत्या चिंतेनंतरही यंदा ही लीग होईल, यावर त्यांनी भर दिला. २९ मार्चपासून होणारे आयपीएलचे १३ वे पर्व कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या भविष्याचा आयसीसीने निर्णय घेतल्यानंतरच आयपीएल आयोजनाचा निर्णय होईल, असे भारताच्या या माजी कर्णधाराने स्पष्ट केले आहे.
‘ इंडिया टुडे’च्या इन्सिपरेशन कार्यक्रमात गांगुली म्हणाले, ‘२०२० हे वर्ष आयपीएलविना संपावे, असे वाटत नाही. भारतात आयोजनास प्रथम प्राधान्य असेल. २५ ते ४० दिवसांचा कालावधी आयोजनासाठी पुरेसा आहे. भारताबाहेर श्रीलंका आणि यूएईपाठोपाठ न्यूझीलंडनेदेखील आयपीएलचे यजमानपद भूषविण्याची तयारी दर्शवली आहे. विदेशात लीगचे आयोजन हा पर्याय असला तरी यामळे खर्चात भर पडणार आहे.’
तुम्ही विदेशात आयोजनाचा विचार केला तरी ते खर्चिक असेल. आयपीएल आयोजनाचा विचार करायचा झाल्यास काही टप्पे आहेत. निर्धारित वेळेत आयोजन करू शकतो का? भारतात शक्य नसल्यास विदेशात आयोजन होईल का? या दोन्ही प्रश्नांवर सखोल चर्चा सुरू आहे.’
दुसरीकडे आयसीसी टी-२० विश्वचषकाचा निर्णय घेण्यासाठी वेळ लावत असल्याने आयपीएलबाबत निर्णय घेण्यास उशीर होत आहे. यावियी गांगुली म्हणाले, ‘आयसीसी वेळ का लावत आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मीडियातून मला वेगळी चर्चा ऐकायला मिळते; मात्र बोर्ड सदस्यांना अधिकृत कळविले जात नाही, तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही.’ भारतात आयोजन झाले तर ते कोणकोणत्या शहरात होईल, यावर गांगुली म्हणाले, ‘मुंबई,
कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली या मोठ्या शहरातील फ्रॅन्चायसी आहेत. या शहरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे.’
आशिया चषक रद्द
सप्टेंबरमध्ये आयोजित होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा सौरव गांगुली यांनी बुधवारी इन्स्टाग्राम लाईव्ह ‘स्पोर्ट्स तक’ या कार्यक्रमात केली. यंदा आशिया चषकाच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला होता. भारतीय संघ पाकिस्तानात खेळत नसल्याने आशिया चषकाच्या आयोजनासाठी पाकने यूएई हे स्थळ निवडण्याचे संकेत दिले होते. तथापि पाकची कुठलीही तयारी नसल्याचे मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे.