-ललित झांबरे
सध्या भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एक खेळाडू असा आहे जो याच्याआधी भारतात वन डे सामना खेळला तेंव्हा विराट कोहलीने एकही कसोटी सामना खेळलेला नव्हता, विश्वविजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे होते, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. आता एवढा 'पुराना' खेळाडू कोण? हा प्रश्न पडणे साहजिक आहे तर 20 ऑक्टोबर 2010 नंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळेल असा हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज मिचेल स्टार्क. 

या गड्याने आतापर्यंत 85 वन डे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत पण 20 ऑक्टोबर 2010 चा तो सामना वगळता तो भारतात वन डे सामना खेळलेला नाही. विशेष म्हणजे त्याचा हा पहिलाच वन डे इंटरनॅशनल सामना होता. दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियन संघ 2011, 13, 17 आणि 2019 मध्ये भारतात वन डे सामने खेळला.या काळात त्यांनी भारतात 19 वन डे सामने खेळले पण त्यापैकी एकाही सामन्यात स्टार्कला ऑस्ट्रेलियाने खेळवले नाही. 2010 ते 2020 या काळात स्टार्क इंग्लंडमध्ये 18, न्यूझीलंड, श्रीलंका, अमिराती, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेत प्रत्येकी पाच वन डे सामने खेळलाय पण भारतात त्याच्या पहिल्या सामन्यानंतर एकही नाही. 

नंतर तो भारताविरुध्द खेळलाच नाही असेही नाही.तो भारताविरुध्द आणखी सात सामने खेळला पण सहा ऑस्ट्रेलियात आणि एक इंग्लंडमध्ये. भारताविरुध्दच्या एकूण आठ वन डे सामन्यात 13 बळी त्याच्या नावावर आहेत पण यापैकी एकही विकेट भारतातील नाही कारण तो जो एकमेव वन डे सामना भारतात खेळला होता त्यात त्याला 51 धावा मोजूनसुध्दा एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे आत्ताच्या या दौऱ्यात त्याने विकेट मिळवली तर 85 वन डे सामन्यांतील 172 विकेटनंतर भारतातील ही त्याची पहिलीच विकेट असेल. विशेष म्हणजे आशियातील 11 सामन्यांमध्ये 18 बळी मिळवताना त्याची सर्वोत्तम सरासरी 18.65 ही आशियातच आहे. आशियातील मैदानावर किमान 100 षटके गोलंदाजी करणारांपैकी केवळ रशिद खान व मुस्तफिझूर रहमान यांचीच सरासरी त्याच्यापेक्षा सरस आहे. 

आणखी एक उल्लेखनीय बाब ही की भारतातील आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परदेशी खेळाडू धडपडत असताना स्टार्क मात्र 2015 पासून आयपीएलमध्येसुध्दा खेळलेला नाही. त्यामुळे तो दीर्घकाळानंतर भारतात खेळणार असला तरी विराट आणि कंपनीला त्याच्यापासून सावधच रहावे लागणार आहे.
 

Web Title: Australian bowler to play in India after 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.