ठळक मुद्देकसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्यावरून विराट कोहली आणि माझ्यात कुठलीही स्पर्धा नाहीविराट कोहली कर्णधार असतो त्यावेळी भारतीय संघाला विजय मिळवून देणे हेच त्याचं उद्दिष्ट असतंजेव्हा मी कर्णधार बनलो तेव्हा मीही तेच केले जे कर्णधार म्हणून विराट कोहली करतो
मुंबई - अॅडलेड कसोटीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुढच्या तीन कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेचं नेतृत्व हा चर्चेचा विषय ठरला होता. तसेच ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने मात दिल्यानंतर अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार करा, अशी मागणी क्रिकेटप्रेमी तसेच काही समीक्षकांकडून सुरू झाली आहे. दरम्यान, पूर्णवेळ कर्णधारपदाबाबत रहाणेने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य रहाणे पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाबाबत म्हणाला की, ''कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्यावरून विराट कोहली आणि माझ्यात कुठलीही स्पर्धा नाही आहे. ज्यावेळी विराट कोहली कर्णधार असतो त्यावेळी भारतीय संघाला विजय मिळवून देणे हेच त्याचं उद्दिष्ट असतं. तसेच जेव्हा मी कर्णधार बनलो तेव्हा मीही तेच केले जे कर्णधार म्हणून विराट कोहली करतो.''
''भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून द्यावा हेच आम्हा दोघांचं उद्दिष्ट असतं. मग संघाचं नेतृत्व कुणीही करो. तसेच कसोटी कर्णधारपदावरून आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करेल आणि मी उपकर्णधारपद सांभाळेन. अशा प्रकारे भारतीय संघाला विजय मिळावा, हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे,'' असेही अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
यावेळी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबदरस्त कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतचेही कौतुक केले. सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये रिषभ पंतने केलेल्या फलंदाजीबाबत रहाणे म्हणाला की, ''तू तुझा नैसर्गिक खेळ खेळत राहा. बाकी कुठल्या गोष्टीची चिंता करू नको, असे रिषभ पंतला सांगण्यात आले होते.''