After the loss wicket of Dhoni, the photographer cried and cried, Learn about Viral Truth | धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य

धोनी बाद होताच फोटोग्राफरला रडू कोसळलं, जाणून घ्या व्हायरल सत्य

मुंबई - विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीमुळे आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी खेळामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यामुळे भारत सामना जिंकले, अशी आशा कोट्यवधी भारतीयांना लागली होती. मात्र, जडेजा झेलबाद झाल्यानंतर सर्वांच्याच नजरा धोनीकडे लागल्या होत्या. तितक्यात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धोनी धावबाद झाला. धोनी बाद झाल्याचा धक्का सव्वाशे कोटी भारतीयांना बसला होता. साहजिकच कित्येकांना अश्रूही अनावर झाले. 

धोनी बाद होऊन पॅव्हेलिनयकडे परतत असताना, भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या होत्या. भारताचे विश्वविजयाचे स्वप्न संपुष्टात आले होते. कारण, धोनी रनआऊट होताच विश्वचषक स्पर्धेतून भारत आऊट झाला होता. गपटीलने मारलेला थ्रो केवळ स्टंप उडवणारा नव्हता, कोट्यवधी भारतीयांच्या काळाजाचा ठोका चुकवणारा होता. काही क्षणातच या थ्रोमुळे अनेकांच्या डोळे पाणावले. सोशल मीडियाही भावूक झाला. धोनीचा हताश झालेला चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर, काही वेळातच धोनीसह एका फोटोग्राफरचाही फोटो व्हायरल झाला होता. 

व्हायरल झालेल्या या कोलाज फोटोत धोनी बाद झाल्यानंतर फोटो काढताना फोटोग्राफरही रडला. कॅमेरामनलाही अश्रू अनावर झाल्याचे कॅप्शन या फोटोसह प्रकाशित आणि व्हायरल झाले. फोटोच सर्वकाही सांगतो. एक फोटो हजार शब्दांच्या पुढे बोलतो, असेही कॅप्शन देण्यात आले. मात्र, तो फोटो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील नसल्याचे सिद्ध झाले आहे. रडणाऱ्या फोटोग्राफरचा तो फोटो जानेवारी महिन्यात झालेल्या आशियाई फुलबॉल चॅम्पियन स्पर्धेतील आहे. या फोटोग्राफरचे नाव अल-अजावी असून तो इराकचा नागरिक आहे. 

गुगल रिव्हर्स इमेज सर्चमधून या कोलाज फोटोची पडताळणी केल्यानंतर trollfutball.me नावाच्या एका वेबसाईटवर हा फोटो प्रकाशित झाल्याचे समोर आले आहे. 24 जानेवारी रोजी हा फोटो प्रकाशित झाला असून 
‘raqi sports photographer crying after losing against Qatar in round of 16 of the Asian cup’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. या आर्टीकलमध्ये तोच फोटो आहे, जो धोनी बाद झाल्यानंतर रडणारा फोटोग्राफर म्हणून व्हायरल होत आहे. 
विशेष म्हणजे या ओरिजनल फोटोवर एशियन कप 2019 चा लोगोही दिसत आहे. 24 जानेवारी 2019 रोजी हा फोटो ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आला आहे. फुलबॉल चॅम्पियन स्पर्धेत आपला संघ पराभूत होतानाही आपलं कर्तव्य हा फोटोग्राफ बजावत होता, पण हा पराभव पचवणं शक्य नसल्याने त्याचे डोळे पाणावले होते. त्यामुळे धोनी बाद झाल्यानंतर रडणारा फोटोग्राफर म्हणून व्हायरल होणारा हा फोटो फेक असल्याचे सिद्ध झाले आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the loss wicket of Dhoni, the photographer cried and cried, Learn about Viral Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.