भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात तो आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत एका रेस्टॉरंटबाहेर दिसल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या आवतीभोवती मोठी गर्दी केली. त्यावेळी एका चाहत्याने हार्दिकला सेल्फीसाठी विनंती केली. परंतु, त्याला नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या चाहत्याने हार्दिकबद्दल चुकीचे विधान केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमसनिमित्त हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री माहिका शर्मा दिल्लीतील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले. रेस्टॉरंटबाहेर पडताच चाहत्यांनी हार्दिकच्या बाजुला गर्दी केली. हार्दिकने सुरुवातीला काही चाहत्यांसोबत सेल्फी काढले. मात्र, गर्दी वाढत असल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव हार्दिकने अधिक सेल्फी घेण्यास नकार दिला आणि तो गाडीकडे वळला. याच दरम्यान एका चाहत्याने त्याला थांबण्याची विनंती केली, पण हार्दिकने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतापलेल्या त्या चाहत्याने रागाच्या भरात हार्दिकबद्दल चुकीचे वक्तव्य केले. या घटनेचा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून नेटिझन्समध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी हार्दिकच्या संयमाचे कौतुक केले आहे, तर काहींनी चाहत्यांच्या भावनांचा अनादर केल्याचे म्हटले आहे.
द. आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी
एकीकडे वैयक्तिक आयुष्यात वादाचे सावट असले तरी, क्रिकेटच्या मैदानावर हार्दिक पांड्या सध्या सुवर्णकाळ अनुभवत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप २०२५ मध्ये दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो काही काळ संघाबाहेर होता. मात्र, पुनरागमन केल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली. द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने २८ चेंडूत ५९ धावा केल्या आणि एक विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात त्याने अवघ्या २५ चेंडूत ६३ धावांची झंझावाती खेळी केली. या मालिकेत त्याने एकूण चार सामन्यात १५६ धावा आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत.
खास विक्रमाला गवसणी
हार्दिक पांड्याने या मालिकेत आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टी-२० क्रिकेटमध्ये २००० हून अधिक धावा आणि १०० विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ऑलराउंडर बनण्याचा मान मिळवला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दृष्टीने हार्दिकचा हा फॉर्म भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.