"हल्ला करणारे तुमचेच माजी नगरसेवक, तेच आज गुंड झाले का?" सावेंचा जलील यांना बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:28 IST2026-01-07T19:26:01+5:302026-01-07T19:28:04+5:30
इम्तियाज जलील यांनी हल्ल्याबाबत आरोप केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांचा पलटवार

"हल्ला करणारे तुमचेच माजी नगरसेवक, तेच आज गुंड झाले का?" सावेंचा जलील यांना बोचरा सवाल
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीत झालेल्या राड्याचे पडसाद शहरात उमटत आहेत. जलील यांनी हा हल्ला पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप केल्यानंतर, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "हल्ला करणारे दुसरे तिसरे कोणी नसून एमआयएमचेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आहेत," असा खळबळजनक खुलासा सावे यांनी केला आहे.
तुमच्याच 'गुंडां'ना तुम्ही तिकीट का दिले?
अतुल सावे म्हणाले की, "जलील ज्यांना गुंड म्हणत आहेत, त्यांनाच त्यांनी मागच्या वेळी तिकीट देऊन नगरसेवक बनवले होते. जर ते गुंड आहेत तर तुम्ही त्यांना संधी का दिली? मुळात जलील यांनी आर्थिक व्यवहार करून तिकिटे वाटली, असा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा संताप आहे. ज्या प्रभागात ही घटना घडली, तिथे आमचा कोणताही संबंध नाही आणि आम्ही तिथे निवडणूकही लढत नाही. त्यामुळे आम्ही हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर येईल
इम्तियाज जलील यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले असल्याचे सांगितले आहे. त्यावर बोलताना सावे म्हणाले की, "हो, पोलिसांनी कारवाई करावी आणि आरोपींना अटक करावी. त्यात सत्य बाहेर येईल." मनपा निवडणूक प्रचार शिगेला पोहचलेला असताना बायजीपूरा परिसरातील घटनेने आता शहराच्या राजकारणाने नवे वळण घेतले आहे.