छत्रपती संभाजीनगरात महिला उमेदवारांचा ‘डंका’; तीन प्रभागांत ३७ रणरागिणी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:25 IST2026-01-09T17:20:55+5:302026-01-09T17:25:01+5:30
२८ अ (अनुसूचित जाती महिला) या प्रभागात एकूण १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगरात महिला उमेदवारांचा ‘डंका’; तीन प्रभागांत ३७ रणरागिणी आमने-सामने
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिला उमेदवारांनी मोठे वर्चस्व निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १६ क, २८ अ आणि २६ अ या तीन प्रभागांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, येथे सर्वाधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. या तीन प्रभागांत मिळून तब्बल ३७ महिला उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक २६ 'अ' (अनुसूचित जाती महिला) मध्ये सर्वाधिक १४ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, येथे एमआयएमवगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले. पक्षाच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी येथे ७ अपक्ष महिला उमेदवारांनीही कंबर कसली आहे, ज्यामुळे येथील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
-२८ मध्ये १२ महिला
२८ अ (अनुसूचित जाती महिला) या प्रभागात एकूण १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह ४ अपक्ष महिला निवडणूक लढवत आहेत. प्रभाग १६ 'क' (सर्वसाधारण महिला) या प्रभागात ११ महिला उमेदवार असून, सर्व पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त ५ अपक्ष महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित बहुजन आघाडीला आपला उमेदवार उभा करता आलेला नाही.
सर्वपक्षीयांसमोर अपक्षांचे आव्हान
या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एमआयएम यांसारख्या दिग्गज पक्षांनी आपले तगडे उमेदवार दिले. मात्र, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर अपक्ष महिला उमेदवारांनी उभे केलेले आव्हान दुर्लक्षित करून चालणार नाही. तिन्ही प्रभागांत मिळून एकूण १६ अपक्ष महिला उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.