मनपाच्या निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील मतदारांना घरून मतदानाची संधी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:52 IST2025-12-24T19:52:03+5:302025-12-24T19:52:38+5:30
कितीही वय असले तरी ज्येष्ठांना मतदान केंद्रांवर जावेच लागणार

मनपाच्या निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील मतदारांना घरून मतदानाची संधी नाही!
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला शहरातील १ हजार २६४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. विविध ठिकाणच्या ३६३ इमारतींमध्ये हे मतदान केंद्र आहेत. गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही तशी संधी संबंधित मतदारांना नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणे खूपच अडचणीचे असते. त्यामुळे गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी संबंधित घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये ही सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्हती. आता महापालिका निवडणुकीतही राज्य निवडणूक आयोगाने ज्येष्ठांना घरून मतदान करण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे १५ जानेवारीला मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना जावे लागणार आहे. ज्येष्ठांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा मनपाच्या निवडणुकीसाठी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आयोगाकडून सूचना नाही
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नियमावली, सूचना आणि मार्गदर्शन करणारी पुस्तिका दिली आहे. त्यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांना घरून मतदान करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे संबंधित मतदारांना मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागेल. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विकास नवाळे, उपायुक्त, महापालिका
आयोगाने अनास्था दाखवल्याचे दु:ख
ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु, ज्येष्ठांप्रती शासन- प्रशासन, निवडणूक आयोगामध्ये आस्था राहिलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत वयोवृद्ध नागरिकांना घरी जाऊन मतदानाची सुविधा देण्यात आली. पण, महापालिका निवडणुकीत ती नाही, याचे दु:ख आहे. अशाही परिस्थितीत आम्ही मतदानाला जाऊ. कोणाला मतदान करायचे ते करू. मात्र, शासनाने अनास्था दाखविली याचे दु:ख आहेच.
- वसंत सबनीस, अध्यक्ष, जिल्हा पेंशनर्स असोसिएशन