वेळ चुकली, संधी हुकली; राजकीय पक्षांनी झुंजवले, अनेक इच्छुक उशीरा अर्ज भरण्यास आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:06 IST2025-12-31T16:06:23+5:302025-12-31T16:06:54+5:30
इच्छुक उमदेवारांनी जवळपास सहा हजार अर्ज विकत घेतले होते.

वेळ चुकली, संधी हुकली; राजकीय पक्षांनी झुंजवले, अनेक इच्छुक उशीरा अर्ज भरण्यास आले
छत्रपती संभाजीनगर : वेळेला किती महत्व आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतु काही उमेदवार अर्ज सादर करण्याची दुपारी ३ वाजेची वेळ संपताना आले. तेव्हा झोन नंबर २ मधील स्मार्ट सीटी कार्यालयाचे दरवाजे बंद झाले होते. अर्ज सादर करण्यासाठी जाऊ द्या, अशी त्यांनी केलेली विनवणी व्यर्थ ठरली. उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. इच्छुक उमदेवारांनी जवळपास सहा हजार अर्ज विकत घेतले होते. मात्र, राजकीय पक्षांनी युतीच्या नावावर उमदेवारीची घोषणा न केल्याने सर्वच इच्छुक ऑक्सिजनवर होते.
राजकीय पक्षांनी युतीच्या नावावर इच्छुक उमेदवारांना मंगळवारी पहाटेपर्यंत ताटकळत ठेवले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारात युती होणार नाही, स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली. इच्छुकांना त्वरित उमेदवारी अर्ज भरून टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची एकच त्रेधा उडाली. अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचे बी फॉर्म मिळवत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. लांबलचक रांगेत उभे राहून उमेदवारी अर्ज भरले. दिवसभरात शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत १८७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात अर्जाची छाननी होणार आहे.
भाजपा-शिंदेसेनेत युतीवरून नाट्यमय घडामोडी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होत्या. उद्धवसेनेनेही राष्ट्रवादी व अन्य पक्षांसोबत बोलणी सुरू ठेवली होती. काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांचीही चर्चा सुरू होती. या मुख्य पक्षांच्या युती-आघाडीत उमेदवारांची पहाटेपर्यंत फरफट सुरू होती. सकाळी सर्वच पक्षांनी इच्छुकांना फोन करून अर्ज भरण्याचे आदेश दिले. काहींच्या हातात बी-फॉर्म दिले. तुम्ही फॉर्म भरा; पक्षाचे पदाधिकारी तुमचा बी-फॉर्म जमा करतील असेही सांगितले. एका पक्षाने उमदेवारी नाकारली तर इच्छुकांनी दुसऱ्या पक्षाचे बी-फॉर्म काही तासँत मिळविले.
सकाळी ११० वाजेपासून सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसमोर गर्दी वाढू लागली. पहिल्या दीड तासात अर्जाची तपासणी करून काही उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी एकच्या आसपास अर्ज भरण्यासाठी महिला-पुरुषांच्या रांगा लावाव्या लागल्या. रांगेत उभे राहून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची वेळ संपली तरी कुठेही रांग संपत नव्हती.
रांगेतील सर्वांचे अर्ज घेतले
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांगेत उभ्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. काही ठिकाणी सायंकाळी सहा वाजले तर काही ठिकाणी पाच वाजले.
रात्री ११:३० पर्यंत तपासणी
ज्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्वाधिक अर्ज आले तेथे रात्री ११:३० पर्यंत अर्जाची तपासणी करण्यात येत होती. रात्रीच पक्षनिहाय अर्जाचे आणि अपक्षांचे गड्ढे वेगळे करण्याचे काम सुरू होते.
झोन- प्रभाग क्र. दाखल अर्ज
०१- ३,४,५- १८९
०२- १५, १६, १७- २०८
०३- ६,१२,१३,१४- १७४
०४- १,२,७- १८२
०५- ८,९,१०,११- २३३
०६- २३, २४, २५- २०४
०७- २१, २२, २७- २३६
०८- २६, २८, २९- २५०
०९- १८, १९, २०- १९४
एकूण १८७०