"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:08 IST2026-01-07T17:07:04+5:302026-01-07T17:08:14+5:30
एमआयएमच्या रॅलीत राडा झाल्यानंतर शिरसाट-जलील यांच्यात 'वाकयुद्ध'

"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागल्यानंतर आता शहरातील दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीत झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया देताना शिंदेसेनेचे प्रवक्ता तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. "जलील यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते संतापले आहेत. त्यांनी केलेले पापच त्यांना भोगावे लागत आहे," असा टोला शिरसाट यांनी लगावला.
बायजीपूरा भागात एमआयएमच्या उमेदवारांसाठी जलील यांची रॅली सुरू असताना काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. यावरून इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत हा हल्ला मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप केला आहे. "आम्ही गप्प बसणारे नाही, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहे, त्यांनी त्यांचे काम करावे," असे जलील यांनी म्हटले आहे.
शिरसाटांचा पलटवार, 'जैसी करनी वैसी भरनी'
जलील यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, "आम्हाला यांच्यावर हल्ला करण्याची अजिबात गरज नाही. जलील एक नंबरचे खोटरडे आहेत. जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत. ओवेसी सोबत आहेत म्हणून कोणी आपले काही करू शकत नाही, हा त्यांचा गर्व आज जनतेने उतरवला आहे."
स्वतःवरच हल्ला करून घेतला
या घटनेनंतर पोलिसांनी बायजीपूरा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनीही या वादात उडी घेत जलील यांनी सहानभूती मिळावी म्हणून स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे.