संभाजीनगर युतीत भडका! 'शिंदेसेनेस शेवटचा प्रस्ताव', भाजपचा स्वबळाचा प्रतीइशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:17 IST2025-12-29T16:16:28+5:302025-12-29T16:17:18+5:30
शिरसाटांनी यापूर्वीचे प्रस्ताव फेटाळल्यामुळे भाजपने एक नवीन आणि अंतिम प्रस्ताव दिला आहे.

संभाजीनगर युतीत भडका! 'शिंदेसेनेस शेवटचा प्रस्ताव', भाजपचा स्वबळाचा प्रतीइशारा
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर: महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी आता अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. शिंदेसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे एकामागून एक आलेले सर्व प्रस्ताव फेटाळल्याने भाजपमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. "आम्ही आतापर्यंत चार वेगवेगळे प्रस्ताव दिले, पण त्यांचे समाधान होत नाही. आता आमचीही स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे," अशा शब्दात ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.
शिरसाटांच्या बंगल्यावर खलबत्ते
आज सकाळी भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, आमदार संजय केणेकर आणि समीर राजूरकर यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धाव घेतली आहे. भाजपने आपल्या ७ जागा कमी कराव्यात, असा आग्रह शिंदेसेनेने धरल्याने वादाची ठिणगी पडली. शिरसाटांनी यापूर्वीचे प्रस्ताव फेटाळल्यामुळे भाजपने एक नवीन आणि अंतिम प्रस्ताव दिला आहे.
सावेंचा थेट आरोप, 'युती तोडण्याचा निर्णय त्यांच्याकडूनच'
यावेळी पत्रकारांशी बोलताना अतुल सावे अत्यंत आक्रमक दिसले. ते म्हणाले, "आम्ही सायंकाळपर्यंत वाट पाहू. जर हा प्रस्ताव मान्य झाला नाही, तर आमचा निर्णय निश्चित झाला आहे. युती तोडण्याचा निर्णय त्यांच्याकडून (शिंदेसेना) होत आहे, आमची तयारी पूर्ण आहे." या विधानामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
तर आम्ही आमचा निर्णय घेऊ
शिवसेनेला आमचा शेवटचा प्रस्ताव, यामध्ये जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या निर्णय घेण्यासाठी तयार आहोत, असे आमदार संजय केनेकर यांनी स्पष्ट केले.
'तडजोड नाहीच! ४१ जागा द्या नाहीतर स्वतंत्र लढू
दरम्यान, "आम्ही ४१ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यावर तडजोड करणार नाही. भाजपला युती करायची असेल तर ठीक, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत," अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सकाळी भाजपला थेट इशारा दिला आहे.