शिंदेसेनेच्या जंजाळांचं टेन्शन मिटलं! आक्षेप फेटाळला; तक्रारदार उमेदवाराने अर्जही मागे घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:04 IST2026-01-02T14:02:39+5:302026-01-02T14:04:24+5:30
शिंदेसेनेच्या राजेंद्र जंजाळांना मोठा दिलासा! आक्षेप फेटाळल्यानंतर तक्रारदार राजाराम मोरेंची निवडणुकीतून माघार

शिंदेसेनेच्या जंजाळांचं टेन्शन मिटलं! आक्षेप फेटाळला; तक्रारदार उमेदवाराने अर्जही मागे घेतला
छत्रपती संभाजीनगर: प्रभाग क्रमांक २२ 'ड' मधील शिंदेसेनेचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. तर दुसरीकडे जंजाळ यांच्या अर्जावर आक्षेप घेणारे अपक्ष उमेदवार राजाराम मोरे यांनी आज शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जंजाळांच्या अर्जावरील मोरेंचा आक्षेप कायदेशीर तांत्रिक बाबींवरून फेटाळून लावला होता.
नेमकं प्रकरण काय होतं?
बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीवेळी राजाराम मोरे यांनी जंजाळ यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप केला होता. या तक्रारीमुळे जंजाळांची उमेदवारी धोक्यात येणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार निवडणूक अधिकारी उमेदवाराने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणी करत नाहीत किंवा त्यावरून अर्ज अवैध ठरवत नाहीत. यामुळे १ जानेवारी रोजीच मोरेंचा आक्षेप फेटाळण्यात आला होता.
पुन्हा दोन अर्ज, पण अखेर माघार!
आक्षेप फेटाळल्यानंतर मोरे यांनी वकिलामार्फत बाजू मांडण्यासाठी आणि कागदपत्रांच्या सत्यप्रती मिळवण्यासाठी पुन्हा दोन अर्ज दिले होते. मात्र, आज शुक्रवारी नाट्यमय घडामोडींनंतर राजाराम मोरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्जच मागे घेण्याचा निर्णय घेतला. मोरेंच्या या माघारीमुळे प्रभाग २२ मधील राजेंद्र जंजाळ यांचा मार्ग सुकर झाला असून, विरोधकांचे एक आव्हान कमी झाले आहे.