तोफ थंड झालीय, आता फक्त कॉर्नर मीटिंगचा सहारा! संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:16 IST2026-01-05T16:16:12+5:302026-01-05T16:16:58+5:30
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नावाखाली बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याबद्दल शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

तोफ थंड झालीय, आता फक्त कॉर्नर मीटिंगचा सहारा! संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना मंत्री संजय शिरसाट यांनी आज उद्धव ठाकरे आणि एमआयएमला लक्ष्य केले. "ज्यांना तोफ म्हटले जायचे, त्यांच्यातील दारुगोळा आता संपला असून, आता फक्त कॉर्नर मीटिंगचा सहारा असून केवळ अहंकारामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे," अशा शब्दांत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या सभांवर टीका केली.
नवाबगिरी खपवून घेणार नाही!
एमआयएमवर निशाणा साधताना शिरसाट म्हणाले की, "हैदराबादचे नवाब येथील तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यांना दंगली घडवल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, हे माहिती आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे, वल्लभभाई पटेलांनी त्यांची नवाबगिरी एका दिवसात उध्वस्त केली होती, आम्ही त्यांचेच वारसदार आहोत." यावेळी त्यांनी हिंदू मतदारांना सावध राहण्याचे आवाहन करत एमआयएम हीच आमची मुख्य विरोधक आणि 'उबठा मामु' त्यांची बी-टीम असल्याचे सांगितले.
बाळासाहेबांच्या पुतळ्यावरून आक्रमक
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नावाखाली बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याबद्दल शिरसाट यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "बाळासाहेब आमचे दैवत आहेत, त्यांचा पुतळा झाकता कामा नये, आयोगाने असे करू नये," असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच नारायण राणे यांच्या संदर्भातील एका जुन्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी 'साहेबांचा शब्द' शिवसैनिकासाठी कसा अंतिम होता, याची आठवण करून दिली.