शासकीय कमिटी, कामाचा ठेका अन् पक्षात बढतीचा शब्द; बंडखोरांसाठी नेत्यांचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 11:58 IST2026-01-03T11:57:44+5:302026-01-03T11:58:28+5:30
अर्ज मागे घेण्यासाठी 'कॅबिनेट' मंत्र्यांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांनीच लावली ताकद; बंडखोरी शमवण्यात यश की तात्पुरती मलमपट्टी?

शासकीय कमिटी, कामाचा ठेका अन् पक्षात बढतीचा शब्द; बंडखोरांसाठी नेत्यांचा फॉर्म्युला
छत्रपती संभाजीनगर : पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोर उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी घेत त्यांना शासकीय कमिटीवर घेऊ, पक्षात बढती आणि कामाचा ठेकाही देण्याचा शब्द देत शांत केल्याचे चित्र शुक्रवारी दिसले.
उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतचा अवधी होता. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांनी त्यांचे अर्ज परत घ्यावे, यासाठी कालपासूनच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. झोन नंबर ७ अंतर्गत प्रभाग २१, २२ आणि २७ मध्ये बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या स्वपक्षातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज काढून घ्यावेत, यासाठी पक्ष नेत्यांकडून त्यांना शासकीय कमिटीवर स्थान देऊ, पक्षाचे मोठे पद मिळेल एवढेच नव्हे तर कामाचा ठेका मिळेल, अशी आश्वासने दिली.
शिंदेसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, खा. संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भाजपकडून मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि उद्धवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपापल्या पक्षाच्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढली. काही जणांना प्रत्यक्ष भेटून, तर काहींच्या मोबाइलवर बोलून त्यांना शांत केले. बहुतेक जणांनी पक्षाच्या नेत्यांचे ऐकून आपला उमेदवारी अर्ज परत घेतला.
स्थानिक नेत्याकडे मागितले लेखी वचन...
पुंडलिकनगर परिसरातील रहिवासी भाजपच्या बंडखोर महिला उमेदवाराने त्यांचा प्रभाग २२ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज परत घ्यावा, यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्याने त्या उमेदवाराशी संपर्क साधून शासकीय कमिटीवर घेण्यात येईल, असे सांगितले. यावर त्या उमेदवाराने तुम्ही जे सांगता ते लेखी दिले, तरच मी उमेदवारी अर्ज परत घेतो, असे उत्तर दिले. नेत्याने लेखी न दिल्याने आम्हीही अर्ज काढण्यास नकार देत उमेदवारी कायम ठेवल्याचे उमेदवाराच्या पतीने सांगितले.