संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 20:07 IST2025-12-29T20:06:36+5:302025-12-29T20:07:23+5:30
शिरसाट विरुद्ध जंजाळ! जागावाटपाच्या वादातून संभाजीनगरच्या राजकारणात 'हायव्होल्टेज' ड्रामा

संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेला पेच आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. भाजपच्या पाचव्या प्रस्तावात शिंदेसेनेच्या वाट्यातील ७ महत्त्वाच्या जागा भाजपला देण्यात आल्याची माहिती समोर येताच, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना अश्रू अनावर झाले. "कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी निवडणूक लढणार नाही," अशी घोषणा करत जंजाळ यांनी कार्यालयातून बाहेर पडणे पसंत केले. या प्रकारामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे कूच केली आहे.
अश्रू आणि आक्रोष जागावाटपाच्या नऊ बैठका होऊनही तोडगा निघत नसल्याने दोन्ही पक्षांत तणाव होता. मात्र, ताज्या प्रस्तावात जंजाळ समर्थकांचे वर्चस्व असलेले ७ प्रभाग भाजपला सोडण्यात आले. ज्या प्रभागांनी विधानसभेत पक्षाला मताधिक्य दिले, तेच प्रभाग का सोडले? असा सवाल करत जंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यालयाबाहेर पडताना जंजाळांच्या डोळ्यातील पाणी पाहून कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट "युती तोडा, स्वबळावर लढा" अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
शिरसाटांच्या घरासमोर कार्यकर्ते जमले
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत जंजाळ आपल्या समर्थकांसह शिरसाटांच्या घराकडे रवाना झाले आहेत. पालकमंत्री शिरसाट यांनी यापूर्वी भाजपला ४१ जागांचा अल्टिमेटम दिला होता, तर मंत्री अतुल सावे यांनीही शेवटचा प्रस्ताव देत प्रतिइशारा दिला होता. आता बाहेरच्या शत्रूशी लढण्यापूर्वी शिरसाटांना स्वतःच्या घरातील (पक्षातील) नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
सर्व मिळून निर्णय घेऊ
दरम्यान, पालकमंत्री शिरसाट यांनी घराबाहेर येत संतप्त कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष जंजाळ यांच्यासोबत चर्चा केली. भाजपचा प्रस्ताव आला आहे. सर्वांना बोलून निर्णय घेणार आहे. मात्र, आपल्यात गैरसमज करून घेऊ नका, शिवसैनिक लढतो. कोणावरही अन्याय होणार नाही, तुम्ही चिंता करू नका, अशी ग्वाही शिरसाट यांनी यावेळी दिली.