लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:56 IST2026-01-08T11:49:57+5:302026-01-08T11:56:07+5:30
इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही.

लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांचा पराभव करण्यात आला. या पराभवाचा वचपा महापालिका निवडणुकीत काढा. ‘मजलीस’ला विरोध करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खा. असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी रात्री आमखास मैदान येथील जाहीर सभेत केले.
जाहीर सभेसाठी ओवेसी ७:३० वाजताच सभास्थळी दाखल झाले होते. ९:१५ वाजता त्यांच्या भाषणाला सुरूवात झाली. प्रारंभी त्यांनी मागील १० वर्षांमध्ये पक्षाने केलेल्या विकासकामांची यादीच वाचून दाखविली. विशेष बाब म्हणजे नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत ५२ जलकुंभ उभारण्यात एमआयएमचा मोठा वाटा असल्याचा दावा केला. त्यानंतर ओवेसी यांनी हळूहळू आपल्या शैलीत एमआयएमचा विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. तिकीट न मिळालेल्या नाराजांच्या नावांचा वारंवार उल्लेख करीत त्यांची नाराजी दूर झाल्याचे त्यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील, बिहारचे अख्तर उल इमान निवडून आले असते तर लोकसभेत वक्फ बिलाला कडाडून विरोध केला असता. हा काळा कायदा मंजूर हाेऊच दिला नसता, असे सांगत त्यांनी निवडणुकांमधील पराभवाचा बदला घ्या, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन केले.
इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही. हा खेळ खेळणारे पावसाळ्यातील बेडूक आहेत. आमच्यासमोर अजून तुम्ही खूप लहान आहात, बच्चे आहात, असा उल्लेखही हल्लेखोरांचा केला. या घटनेवर ‘इस चमन को सैरा नहीं होने दूँगा....’ हा शेर त्यांनी सादर केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे, त्यांनी अशा लोकांना ‘दुबई’ येथे पाठविले पाहिजे. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांनी प्रखर टीका केली. आम खास मैदानावर रात्री मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मैदानावर तळ ठोकून होते.
त्यांचे तर दोन नंबरचे धंदे
जिन्सी येथे बुधवारी दुपारी हल्ला करणाऱ्यांचे धंदे काय आहेत, तर दोन नंबरचे, हे आम्ही बाहेर काढले तर महागात पडेल. आम्हाला कोणी घाबरविण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी त्यांचे काम करावे. हल्ले करणाऱ्यांच्या वाहनांमध्ये पेट्रोल कोण टाकते आहे, हे माहीत असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.