ताण, उद्रेक, संताप, मनोमिलन; पॉलिटिक्सचा हायहोल्टेज ड्रामा अनुभवला छ. संभाजीनगरकरांनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:55 IST2026-01-14T16:55:20+5:302026-01-14T16:55:41+5:30
२ जानेवारीपासून सुरू झालेल्या रणधुमाळीचा धुराळा मंगळवारी शांत झाला आहे.

ताण, उद्रेक, संताप, मनोमिलन; पॉलिटिक्सचा हायहोल्टेज ड्रामा अनुभवला छ. संभाजीनगरकरांनी
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कारभाऱ्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.१३) थांबली. दोन आठवड्यांच्या प्रचारात राजकारणाचा हायहोल्टेज ड्रामा शहरवासीयांनी पाहिला. ताण, उद्रेक, संताप अन् मनोमिलनाच्या दृष्याने प्रचाराची रणधुमाळी रंगली. नाराजीतून झालेली बंडखोरी थोपविण्यासाठी पक्षनेत्यांनी बंडखोरांच्या घरी-दारी जावे लागले. उमेदवारी न मिळाल्यामुळे नेत्यांच्या वाहनांना घेरणे, पोस्टर फाडणे, प्रचार कार्यालय जाळणे, कार्यालयात उपोषण करणे, शिवीगाळ करण्याच्या घटना घडल्या. घटक पक्षांसोबत युती केल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भूमिका घेऊन मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या देण्याच्या घटनांनी राजकारण ढवळून निघाले. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये झालेली धुसफूस वेगळ्या चुली मांडण्यापर्यंत गेली.
या सगळ्या धुसफुसीचा फायदा इतर पक्षांना मिळाला. नाराजांनी इतर पक्षांचा बी फॉर्म घेत निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन अनेक प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मतांचे गणित बिघडवले आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत एकत्रित येण्यावरून प्रमुख पक्षांच्या बैठका झाल्या. युती करण्यावरून तर डझनभर बैठका होऊन कुणाचीच एकत्रित दाळ शिजली नाही. त्याचे परिणाम निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वत्र पाहायला मिळाले. २ जानेवारीपासून सुरू झालेल्या रणधुमाळीचा धुराळा मंगळवारी शांत झाला आहे.
नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला...
११५ वॉर्डांसाठी असलेल्या २९ प्रभागांतून ८५९ उमेदवार मैदानात आहेत. त्यांनी प्रचारासाठी लावलेल्या रिक्षांवरील भोग्यांनी गल्लीबोळा दणाणून सोडल्या होत्या. तो आवाज आज बंद झाल्याने नागरिकांना १४ रोजी शांततेत संक्रांत साजरी करता येईल. सर्वत्र कार्यकर्त्यांची टाेळी एकामागून एक मतदारांचे उंबरठे झिजवत राहिली. वैतागलेल्या नागरिकांनी रणधुमाळी संपल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
प्रचारात अंतर्गत गटबाजीतून चित्र ...
काही उमेदवारांचे बी फॉर्म अंतिम झाले होते. परंतु गटबाजीतून अनेकांच्या उमेदवाऱ्या अचानक कापल्या गेल्या. त्यामुळे दुसऱ्या पक्षातून अनेकांनी उमेदवारी घेतली. भाग बदलून अनेकांनी दुसऱ्या प्रभागात जंप केले आहे. त्याचाही परिणाम प्रचारात जाणवला. शक्तीप्रदर्शन, सभांचे ठिकाणे बदलणे, अंतर्गत गटबाजी, चार-चार उमेदवार प्रभागात असतांना एकेकट्याने प्रचार करण्यासारखे चित्र शहरातील सर्वत्र होते. सेटलमेंट पॉलिटिक्सच फिल यंदाच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात जाणवले. पक्ष कुठलाही परंतु आपल्या जवळचा रिंगणात असल्याने अनेक नेत्यांनी मतदारसंघ वाटून घेत प्रचार केला. काही प्रभागांत रोज पदयात्रा काढल्या तर कुठे एक बैठकही घेतली नाही.