'मी नाही, माझे कार्यकर्ते लढणार' म्हणणारे शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ स्वतःही रिंगणात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:26 IST2025-12-31T16:21:24+5:302025-12-31T16:26:07+5:30
शिंदेसेनेतील अंतर्गत नाराजी एका दिवसांत अखेर दूर; माघार घेणारे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शेवटच्या दिवशी दाखल केला अर्ज

'मी नाही, माझे कार्यकर्ते लढणार' म्हणणारे शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ स्वतःही रिंगणात!
छत्रपती संभाजीनगर: महायुतीमधील जागावाटपाच्या तिढ्यावरून ढसाढसा रडणारे आणि उमेदवारी नाकारणारे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सोमवारी "कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी लढणार नाही," असे म्हणत निवडणुकीतून माघार घेणाऱ्या जंजाळ यांनी आज मंगळवारी (३० डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला आहे, त्यामुळे माझी नाराजी दूर झाली," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय होता पेच?
जागावाटपात शिंदेसेनेच्या ७ विद्यमान नगरसेवकांच्या जागा भाजपला सोडल्या जात असल्याने जंजाळ अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. या घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर रात्री शिरसाट यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांच्यासह जमून जंजाळ यांनी जागा वाटपावर रोष व्यक्त केला, मात्र, सकाळी राजकीय हालचालींना वेग आला आणि शिंदेसेना आणि भाजप यांची युती फिस्कटली. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
कार्यकर्त्यांचा आग्रह, म्हणून लढतोय
आज अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जंजाळ म्हणाले, "माझी लढाई स्वतःसाठी नव्हती, तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी होती. आता माझ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता की मी स्वतःही निवडणूक लढवावी, त्यांच्या प्रेमापोटी मी हा अर्ज भरला आहे." दरम्यान, आज अर्ज छाननीनंतर किती उमेदवार राहतात हे स्पष्ट होईल.
रडलेल्या घुले यांना मिळाले तिकीट
महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शारदा घुले या सोमवारी मध्यवर्ती कार्यालयात ढसाढसा रडल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी पक्षाचे 'एबी' फॉर्म मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. पाहायला मिळाला. प्रभाग - ८ मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.