युतीत शिंदेसेनेच्या ७ जागा अडचणीत; जिल्हाप्रमुखांची कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीतून माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:35 IST2025-12-29T15:34:00+5:302025-12-29T15:35:18+5:30
महायुतीच्या जागावाटपावर व्यक्त केली तीव्र नाराजी; कार्यकर्त्यांसाठी स्वतःचा मतदारसंघ सोडला

युतीत शिंदेसेनेच्या ७ जागा अडचणीत; जिल्हाप्रमुखांची कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीतून माघार
छत्रपती संभाजीनगर: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि भावनिक निर्णय घेतला आहे. "जागा कमी मिळत असतील तर माझ्यासाठी जागा अडवू नका, माझ्या कार्यकर्त्यांना संधी द्या," असे म्हणत जंजाळ यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
७ जागा सोडण्यावरून संताप
जागावाटपात शिंदेसेनेच्या विद्यमान ७ नगरसेवकांच्या जागा सोडल्या जात असल्याने जंजाळ अत्यंत नाराज आहेत. "ज्यांनी निष्ठेने पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम केले, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी निवडणूक लढवू शकत नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. ''शिंदेसेनेच्या सात नगरसेवकांच्या जागा भाजपला देण्यात आल्या आहेत. यामुळे सहाजिकच पक्षाचे सीट कमी झाल्याने कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे'', असे जंजाळ यांनी पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जाहीत केले.
सायंकाळी अंतिम घोषणा
एकीकडे संजय शिरसाट यांनी ४१ जागांचा आग्रह धरला असताना, दुसरीकडे जंजाळ यांच्या या भूमिकेमुळे भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आज सायंकाळी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जंजाळ यांनी घेतलेला हा पवित्रा कार्यकर्त्यांच्या मनात घर करून गेला आहे.
भाजपला अधिक जागा देण्यावरून नाराज
भाजप सोबत करण्यात आलेली जागावाटप याविषयी आपल्याला तसेच खासदार संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांना कोणतीही माहिती नाही.नसल्याचे जंजाळ यांनी स्पष्ट केले. राजेंद्र जंजाळ हे भाजपला अधिक जागा देण्यावरून नाराज असल्याचे दिसते. यातूनच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.