शिंदेसेनेने छत्रपती संभाजीनगरात तीन माजी महापौर, नेत्यांच्या मुलांसह ९९ जणांना दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:06 IST2025-12-31T12:56:03+5:302025-12-31T13:06:13+5:30
भाजप अधिक जागा देण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी भाजप आणि शिंदेसेना यांच्यामधील युती तुटली.

शिंदेसेनेने छत्रपती संभाजीनगरात तीन माजी महापौर, नेत्यांच्या मुलांसह ९९ जणांना दिली उमेदवारी
छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९९ उमेदवार मैदानात उतरविले. यात तीन माजी महापौर आणि २० हून अधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी शिंदेसेनेने तब्बल दहा दिवस दहा बैठका घेतल्या. मात्र, भाजप ३७ जागा देत होता. भाजप अधिक जागा देण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी भाजप आणि शिंदेसेना यांच्यामधील युती तुटली. यानंतर शिंदेसेनेने तब्बल ९९ उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म वाटप केले. युती झाली असती तर ६३ पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळाले नसते. स्वतंत्र निवडणूक लढवत असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व ९९ उमेदवारांना बी फॉर्म देऊ शकलो, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.
३ माजी महापौरांसह २० माजी नगरसेवक
९९ जणांच्या उमेदवारांच्या यादीत माजी महापौर अनिता घोडेले, त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह २० माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली.
नेत्यांच्या मुलांना उमेदवारी
पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा, मुलगा सिद्धांत यांना तसेच आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश यांना पक्षाने उमेदवारी दिली.